मुंबई : एसआरए फ्लॅट विक्रीच्या नावाने एका ६० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची सुमारे २६ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन संदीप अरविंद भाटे या दलालाविरुद्ध दहिसर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला ही महिला दहिसर येथे राहते. तिचे पती रेल्वेतून निवृत्त झाले असून, त्यांचे पेंशन तिला मिळते. २०१७ साली तिने दहिश्रसर येथील डोंगरी, शांतीनगरातील जनकल्याण इमारतीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. ऑक्टोंबर २०१८ रोजी तिचा मुलगा निलेशच्या मित्राने त्याची ओळख संदीप भाटेशी करून दिली होती. संदीप हा रुम खरेदी-विक्री दलालीचे काम करतो. त्याने निलेशला बोरिवलीतील काजूपाडा, साईद्वारका एसआरए इमारतीचा एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट त्याचा भाऊ प्रसन्ना भाटे याच्या मालकीचा त्याला तो फ्लॅट एसआरएअंतर्गत मिळाला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रतिभा ही निलेशसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. फ्लॅट पसंद पडल्यानंतर त्यांच्यात २७ लाख ५० हजारामध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. यावेळी त्यांनी त्याला साडेआठ लाख रुपये आगाऊ दिले होते.