भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात २६ हजार पर्यटकांनी केली राणीबागची सफर

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात २६ हजार पर्यटकांनी केली राणीबागची सफर
Published on

कोरोना निर्बंधांमुळे बंद असलेली भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणी बाग) पर्यटकांसाठी पुन्हा खुली झाली आणि राज्यभरातून राणीबाग पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची एकच गर्दी उसळली. शनिवार आणि रविवार पर्यटक राणीबागेत येत असतात. मात्र या रविवारी तब्बल २६ हजार १११ पर्यटकांनी राणीबागेची सफर केली आहे. तर सोमवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त असलेल्या सुट्टीमुळे सोमवारी देखील अशीच गर्दी होण्याची शक्यता राणीबाग प्रशासनाने वर्तविली आहे.

कोविड निर्बंधामुळे बाहेर न पडणारे पर्यटक आणि कोरोना काळात बंद असलेली राणीबाग यामुळे राणीबागेत झालेले बदल केवळ नागरिकांना ऐकायला मिळत होते. प्रत्येक्षात मात्र राणीबागेतील प्राणी पक्षी त्यांचे अत्याधुनिक पिंजरे पाहण्याची संधी त्यांना मिळत नव्हती. त्यामुळे सध्या शनिवार आणि रविवारी अपेक्षेपेक्षाही राणीबागेतील गर्दी वाढल्याने राणीबाग प्रशासनाला ही गर्दी आटोक्यात आणताना नाकी नऊ येत आहेत.

या आठवड्यात शनिवारी ता. १४ रोजी १७ हजार ६१७ नागरीकांनी राणीबागेची सफर केली. तर रविवारी ता. १५ रोजी राणीबाग अक्षरशः हाउस फुल झाल्याचा फील आला. राणीबागेच्या गेट जवळ तिकीट काढणाऱ्यांची संख्या २६हजार १११ जास्त होती राणीबागेत येण्यासाठी देखील जागा राहिली नव्हती. मागील आठवड्यातील शनिवारी १५ हजार १९१ तर रविवारी २४ हजार २० जणांनी राणीबागेतील सफारीचा आनंद लुटला. यापूर्वी १४ ते १७ एप्रिल या ४ दिवसांच्या मोठ्या सुटीमध्ये तब्बल ४९ हजार ०३४ पर्यंटकांनी राणीबागची सफर केली.

राणीबागेत सध्या पेंग्विनसोबत, बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या, वाघ पर्यटकांना पाहण्यासाठीदेखील पिंजर्‍यातही ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्राण्यांसोबत पक्षांसाठी देखील अत्याधुनिक पिंजरे उभारले आहेत. रॉयल बंगाल वाघांची जोडी आणि पेंग्विन्स पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. उद्यान-प्राणिसंग्रहालयात एकूण १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी व ७ जातींचे ३२ सरपटणारे तसेच जलचर प्राणी असे एकूण २७३ प्राणी/पक्षी अस्तित्वात आहेत. म्हणजेच राणीबागमध्ये सध्या शंभरहून अधिक प्राणी आहेत. विविध ३० प्रजातींचे सुमारे २५० पक्षी पर्यटकांना याठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय २८६ प्रजातींचे सुमारे साडेतीन हजार झाडे दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी अनेक वृक्षप्रेमी राणीबागेत हजेरी लावतात. विशेषतः शनिवार व रविवारीही अधिक पर्यटक हजेरी लावत असल्याचे जीव शास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी सांगितले

सध्या कोविडची परिस्थीती नियंत्रणात असली तरी कोविडच्या गाईडलाईन पाळून योग्य ती खबरदारी घेऊन पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे.तसेच पर्यटकांच्या दृष्टीने काही सुधारणा करता येतात का याकडे सदैव लक्ष देण्यात येत असल्याचे राणीबागचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

कोट्स

सोमवार ते शुक्रवार सुमारे चार हजार पर्यटक राणीबाग पाहण्यासाठी येतात. मात्र शनिवारी हीच संख्या १० हजाराहून अधिक तर रविवारी १५ हजारांहून अधिक होते. मात्र कोविड नंतर निर्बंध शिथील झाल्याने हीच गर्दी रविवारची पर्यटक संख्या २४ हजारावर देखील जात आहे. आजच्या रविवारी मात्र ही संख्या २६ हजारावर गेली आहे. ही रविवारची सर्वाधिक गर्दी म्हणता येईल.

- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक , राणीबाग

logo
marathi.freepressjournal.in