मुंबईत पुन्हा एकदा २६/११? आत्मघाती हल्ल्याची पाकिस्तानातून धमकी

धमकीनंतर वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला
मुंबईत पुन्हा एकदा २६/११? आत्मघाती हल्ल्याची पाकिस्तानातून धमकी

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात शस्त्रास्त्रांनी भरलेली बेवारस बोट सापडल्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईत पुन्हा एकदा २६ नोव्हेंबरसारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या धमकीची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेच्या तीन पथकांसह एटीएसकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असून, प्राथमिक तपासात हा धमकीचा मॅसेज पाकिस्तानातून आल्याचे उघडकीस आले आहे.

धमकीनंतर वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. वरळी येथे असलेल्या मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्स-अॅप कॉलवर रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून मुंबई शहरात पुन्हा २६/११ सारखा आत्मघाती हल्ला होणार असल्याचा मेसेज पाठविला होता. या धमकीची माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठांना देण्यात आली आहे.

“आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. यावेळीही २६/११ सारखा हल्ला केला जाईल. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही भारतीयही आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. या हल्ल्यामुळे २६/११ हल्ल्याच्या स्मृती ताज्या होतील. मुंबई उडविण्याची तयारी पूर्ण झाली असून, आता काही वेळ शिल्लक राहिला आहे. आपण कुठल्याही क्षणी हल्ला करू. ही धमकी नसून आपण प्रत्यक्षात हल्ल्यासाठी येतोय. माझे लोकेशन पाकिस्तानमध्ये ट्रेस होईल; पण काम मुंबईत होईल. आमचा कोणताही ठिकाणा नसतो. त्यामुळे लोकेशन तुम्हाला आऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. उदयपूरसारखा शिर धडावेगळे करण्याचाही हल्ला होऊ शकतो,” अशी धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या मोबाइलवरून ही धमकी देण्यात आली, तो क्रमांक पाकिस्तानाच्या मोहम्मद इम्तियाज नावाच्या एका व्यक्तीचा आहे. मोहम्मद इम्तियाज हा लाहोरचा रहिवासी असून त्याचा मोबाइल काही दिवसांपूर्वी हरविला होता. याच मोबाइलवरून दुसऱ्या व्यक्तीने धमकी दिली आहे. त्यामुळे या धमकीनंतर मुंबई पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. दुसरीकडे आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी आदी सण असल्याने मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सणांना कुठेही गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेऊन जास्तीत जास्त नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनवर भर देण्यास सांगण्यात आले.

मुंबईसह उत्तर भारत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात लपून बसलेल्या जुनैद या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर त्याच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. “या हल्ल्यासाठी मला जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायचे होते; मात्र कोरोनामुळे जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे मी इथेच ट्रेनिंग घेत होते. इतर राज्यातल्या १०-१२ जणांनाही त्याने या हल्ल्याच्या तयारीसाठी सोबत घेतले होते,” असे जुनैदने दहशतवादी विरोधी पथकाला सांगितले.

विरारमधून संशयित व्यक्तीला अटक

मुंबईत २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी एका संशयिताला विरारमधून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संशयित व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेली व्यक्ती उत्तर प्रदेशातील असल्याचे कळते.

मुंबई पोलीस सज्ज - विवेक फणसाळकर

गुन्हे शाखेच्या तीन युनिटला कामाला लावण्यात आले आहे. त्यांच्यासाठी एटीएस, राष्ट्रीय तपास यंत्रणा, गुप्तचर विभाग तसेच रॉ या तपास यंत्रणेची मदत घेतली जात आहे. मुंबईकरांना घाबरण्याचे काहीही कारण नसून, मुंबई पोलीस अशा धमक्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहून संशयित व्यक्ती आणि वस्तूची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in