
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प २ - अ, २ - ब आणि ७ या प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून प्राप्त झालेल्या रक्कमेपैकी २७२ कोटी ८० लाख ४१ हजार रुपये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरीत करण्यात येणार आहेत. या बाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
मुंबई मेट्रो लाईन - २ टप्पा - १ (दहिसर (पू) डी. एन. नगर), मुंबई मेट्रो लाईन - ७ अंधेरी (पूर्व) व दहिसर (पूर्व) व मुंबई मेट्रो लाईन - २ प्रकल्प टप्पा - २ ब डी. एन. नगर - मंडळे या उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शासनाने मान्यता दिली आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी प्राधिकरणाचा स्वतःचा निधी, केंद्र व राज्य शासनाचे सहाय्य व बाह्य वित्तीय संस्थेचे कर्ज या माध्यमातून निधी उभारून करावयाची आहे. या प्रकल्पावर प्रकल्प अंमलबजावणी संस्था मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रथम खर्च करणार असून केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती दावे एशियन डेव्हल्पमेंट बँकेस सादर करणे बंधनकारक आहे. एशियन डेव्हल्पमेंट बँकेने २७२ कोटी ८० लाख ४१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध केला असून आतापर्यंत या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास २६८०.९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोच्या या कामांना गती मिळणार आहे.