
मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत १३ हजार ४०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील ३८ मतदान केंद्रांवर आणि ६४ बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे.
सिनेट निवडणुकीसाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार ३८ केंद्र आणि ६४ बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. तर पुढील प्रशिक्षण १९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.
संकेतस्थळावर केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध
विद्यापीठाच्या https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बुथनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार आपल्या नावाने आणि मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे मतदार यादीतील त्याचे नाव, मतदान केंद्र आणि बुथ क्रमांक पाहू शकणार आहेत.