प्रकल्पांच्या उद्घाटनांवर २८ कोटींचा चुराडा; BMC कडून अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन

मुंबई महापालिकेने मागील वर्षांत हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पायाभरणीचे कार्यक्रम राबवले.
प्रकल्पांच्या उद्घाटनांवर २८ कोटींचा चुराडा; BMC कडून अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेने मागील वर्षांत हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पायाभरणीचे कार्यक्रम राबवले. या प्रकल्पाच्या उद्घाटनावर पालिकेने आतापर्यंत २८ कोटी रुपयांचा चुराडा केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. तसेच, येत्या काळात प्रस्तावित प्रकल्पांचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्यामुळे या रकमेत वाढ होऊ शकते. असेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांत पालिकेच्यावतीने ८० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे विविध प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बोगदा, वर्सोवा दहिसर लिंक रोड तसेच दहिसर-मीरा भाईंदर कनेक्टर या प्रकल्पाचा समावेश आहे. तर अनेक ठिकाणी सुशोभीकरण मोहीम आणि रस्ता काँक्रिटीकरण प्रकल्पही राबवण्यात आले आहेत.

यासंदर्भात महापालिकेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार चालू आर्थिक वर्षात उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभांवर आतापर्यंत १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर २०२३ - २४ या गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या आर्थिक वर्षात उद्घाटनांशी संबंधित १० कोटी रुपयांची बिले आधीच मंजूर करण्यात आली आहेत.

मुंबई महापालिकेने विविध प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत हे खरे आहे. प्रकल्पांचे भूमिपुजन आणि उद्धाटन हे प्रथेनूसारच केले जाते. २० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च या कार्यक्रमांवर झाला असला तरी कार्यक्रमही तितक्याच प्रमाणात झाले आहेत.

जनसंपर्क अधिकारी, महापालिका

महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये कर्मचारी नाही, औषधांचा साठा मुबलक प्रमाणात आहे, पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी झाले आहेत. रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे नागरिकांचे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही. पालिकेने उद्घाटनावर पैश्याची उधळपट्टी करण्यापेक्षा मूलभूत सुविधावर खर्च करावे.

- बाळा नर, आमदार व माजी नगरसेवक

logo
marathi.freepressjournal.in