Mumbai : संगीत कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू

मुंबईत रविवारी पहाटे एका संगीत कार्यक्रमादरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Mumbai : संगीत कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू
Mumbai : संगीत कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू(Photo - FPJ)
Published on

मुंबई : मुंबईत रविवारी पहाटे एका संगीत कार्यक्रमादरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांनीही मद्यप्राशन केले असले, तरी अमली पदार्थांच्या सेवनाचा कोणताही पुरावा सापडलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित 'क्लांगकुएन्स्टलर ऑल नाईट लाँग' या संगीत कार्यक्रमादरम्यान या दोन्ही वेगवेगळ्या घटना घडल्याचे ताडदेव पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

संगीत कार्यक्रम सुरू असतानाच संबंधित व्यक्तीची प्रकृती अचानक खालावली. त्याला तातडीने प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर त्याला मलबार हिल भागातील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. या अनपेक्षित घटनेमुळे कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या हजारो संगीतप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सीसीटीव्ही आणि आयोजकांची चौकशी सुरू

‘शवविच्छेदन अहवाल आणि इतर वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष आल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल,’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून आयोजकांकडील नोंदी आणि प्रत्यक्षदर्शी उपस्थितांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. कोणताही घाईघाईने निष्कर्ष न काढता सर्व पुराव्यांची काटेकोर तपासणी करूनच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मद्यासोबत एनर्जी ड्रिंक्स घेतल्याने महिलेला त्रास

प्राथमिक निष्कर्षानुसार, डिहायड्रेशनमुळे (शरीरातील पाणी कमी होणे) या तरुणाचा मृत्यू झाला असावा, असे दिसून येत आहे. मात्र, पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले. दुसऱ्या घटनेत, एका ३१ वर्षीय महिलेने कार्यक्रमादरम्यान प्रकृती बिघडल्याची तक्रार केली. त्यानंतर तिला जसलोक रुग्णालयात नेण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.आपण मद्यासोबत काही एनर्जी ड्रिंक्स घेतले होते, असे या महिलेने पोलिसांना सांगितले असल्याचे ते पुढे म्हणाले.

ताडदेव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

'आमच्या तपासात आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचा वापर केल्याचे समोर आलेले नाही. घटनेचा नेमका क्रम समजून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे', अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या वर्षाच्या एप्रिल महिन्यात, अशाच एका संगीत मैफिलीला उपस्थित राहिलेल्या दोन एमबीए विद्यार्थ्यांचा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. पोलिसांनी नंतर या प्रकरणाच्या संदर्भात अनेक जणांना अटक केली होती.

'ड्रग्ज' कनेक्शनचा पोलिसांना संशय?

सध्या या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. या संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांचे सेवन झाले होते का? आणि मृत व्यक्तीने काही अंमली पदार्थांचे सेवन केले होते का? या शंकेच्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास चक्र फिरवली आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गोरेगाव परिसरातील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये अशाच एका मोठ्या संगीत कार्यक्रमात ड्रग्जच्या संशयावरून मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in