मुंबई : दिवाळीमध्ये ९ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई अग्निशमन दलाला २८० तातडीचे दूरध्वनी करण्यात आले होते. यामध्ये ७९ दूरध्वनी फटाक्यांच्या संबंधातील होते, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे यातील फटाक्यांसंबंधातील घटनांबद्दलचा विचार करता, यावेळी ७९ दूरध्वनी कॉल आले, तर २०२१ मध्ये ही संख्या फक्त ६५ होती, तर २०२२ मध्ये ती संख्या फक्त ३७ इतकीच होती.
यावेळी आलेल्या दोन दूरध्वनींद्वारे दिलेली माहिती ही लेव्हल वन च्या घटनेसंबंधातील होती. त्यामुळे त्यासाठी अग्निशमन दलाने आठ बंब तातडीने तेथे रवाना केले होते. यावेळी आलेल्या ७९ दूरध्वनींमध्ये १२ नोव्हेंबरला २७ दूरध्वनी आले, तर १९ नोव्हेंबरला १४ व १३ नोव्हेंबरला १३ दूरध्वनी आले होते. हे ७९ दूरध्वनी फटाक्यांसंबंधातील आग दुर्घटनेबद्दलचे होते. हवेच्या घसरत्या दर्जामुळे कठोर आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही फटाके फोडण्यामुळे झालेल्या अशा दुर्घटनांसंबंधातील दूरध्वनींची संख्या ही अधिक असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन दलाच्या तपशिलाप्रमाणे १२ नोव्हेंबरला ७८ दूरध्वनी आले. १३ नोव्हेंबरला ६८, तर १५ नोव्हेंबरला ४३ दूरध्वनी अग्निशमन दलाला आले होते.
या दिवाळीच्या कालावधीत विलेपार्ले येथे ११ मजली इमारतीत लागलेल्या आगीत एक ९५ वर्षांची महिला मरण पावली. तर अन्य चार जण विविध घटनांमध्ये जखमी झाले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात आगीच्या २७ घटना घटल्या. यामध्ये एका घटनेत जोगेश्वरीतील एका इमारतीच्या १३ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीत रॉकेट घुसल्याने आग लागली होती, अशी माहितीही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.