
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये आता २८ मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत ही घोषणा केली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचारप्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत." अशी माहिती त्यांनी दिली आहे.