२९ दिवसांच्या बाळाला मिळाले जीवनदान

बाळ अॅरिथमिया मुक्त आहे, त्याचे वजन २.८ किलो आहे आणि ते इतर मुलांप्रमाणे आहार घेत आहे
 २९ दिवसांच्या बाळाला मिळाले जीवनदान
Published on

परळ येथील वाडिया रुग्णालयात दुर्मीळ अनुवांशिक विकार असलेल्या ट्युबेरस स्क्लेरोसिसच्या हृदयातील मल्टिपल (रॅबडोमायोमास) ट्युमर असलेल्या एका २९ दिवसांच्या बाळाला दुसरे जीवन दिले आहे. ज्यामुळे हृदयाची गती (ठोके) २३० इतकी वाढली. ट्युमर कमी करण्यासाठी एका जीवनरक्षक औषधाने बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले. आता, बाळ अॅरिथमिया मुक्त आहे, त्याचे वजन २.८ किलो आहे आणि ते इतर मुलांप्रमाणे आहार घेत आहे.

कर्जतपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या गुढवण येथे राहणाऱ्या कविताने मुलाला जन्म दिल्यानंतर संपूर्ण कांदवी कुटुंब आनंदी होते; पण जन्मानंतर बाळ रडले नाही म्हणून या जोडप्याच्या आनंदात विरजण पडले. स्थानिक डॉक्टरांनी पालकांना बाळाच्या असामान्यपणे वेगवान हृदय गतीबद्दल सांगितले. त्यांनी बाळाला बदलापूर येथील क्लिनीकमध्ये नेले. तिथे अँटिअॅरिथिमिक्स नावाची दोन अँटी-टाकीकार्डिया औषधे सुरू करण्यात आली. बाळाला आवश्यक तेवढा आराम मिळाला नाही आणि पुढील उपचारासाठी त्याला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.

“बाळाचे हृदय निकामी झाल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी ईसीजी केल्यानंतर हृदयाची असामान्य लय, तसेच २३० बीपीएम वेगाने हृदयाची गती दर्शविण्यात आली. हृदयविकाराच्या अनियंत्रित गतीमुळे, बाळाला हार्ट फेल्युअरचा धोका होता. बाळाच्या हृदयाच्या स्कॅनमध्ये रॅबडोमायोमाच्या वैशिष्ट्यांसह अनेक मोठे आणि लहान ट्युमर दिसून आले,” असे वाडिया हॉस्पिटलच्या वरिष्ठ पेडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट डॉ. जयश्री मिश्रा म्हणाल्या.

रक्तातील साखर, सीरम लिपिड्स आणि हिमोग्लोबीनचे निरीक्षण करून, बाळाला नवजात शिशू अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. हे कर्करोगविरोधी औषध शरीराच्या प्रतिकारशक्तीवर दबाव आणण्यासाठी ओळखले जाते. म्हणून, मुलाला रोगप्रतिबंधक प्रतिजैविके देण्यात आली आणि त्याला कडक अॅसेप्सिसमध्ये ठेवण्यात आले. दुय्यम संक्रमणास प्रतिबंध करण्यात आले. तीन आठवड्यानंतर सर्व लहान ट्युमर निघून गेले, तर सर्वात मोठा ट्युमर १ सेमी आकाराने कमी झाल्याचे दिसून आले, असेही डॉ. जयश्री यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in