
आज पुन्हा एकदा मुंबई लोकल (Mumbai Local) कोलमडली. कारण, आज सकाळी हार्बर मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले. यामुळे खारकोपर ते नेरुळ लोकल सेवा ठप्प झाली. सुदैवाने या अपघातात कोणाही जखमी झाले नाही. दुर्घटनेच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पोहचले असून लोकलचे डबे पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माहिती दिली की, "आज सकाळी ८.४५ वाजता बेलापूर ते खारकोपरमध्ये मुंबई लोकलचे ३ डब्बे घसरले. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. घटनास्थळी मदतीसाठी बचाव पथकाची वाहने दाखल झाली आहेत. डबे रुळावर आणण्यासाठीचे आणि लोकल पूर्वपदावर आण्यासाठी काम सुरू आहे." अशी माहिती दिली. परंतु, यामुळे बेलापूर-खारकोपर-नेरुळ या मार्गावरील लोकलवरती परिणाम झाला. या अपघातानंतर हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला. मात्र हार्बर मार्गावरील इतर गाड्या वेळापत्रकानुसार धावत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सुतार यांनी दिली आहे.