फ्लॅटसाठी घेतलेल्या ३ कोटी ३४ लाखांचा अपहार

अनेकांना फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे
फ्लॅटसाठी घेतलेल्या ३ कोटी ३४ लाखांचा अपहार

मुंबई : फ्लॅटसाठी घेतलेल्या ३ कोटी ३४ लाख रुपयांचा अपहार करून फसवणुक केल्याप्रकरणी साईसागर कन्सल्टन्स कंपनीच्या पाच संचालकाविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. जयेश विनोद तन्ना, दिप विनोद तन्ना, श्रद्धा जयेश तन्ना, विवेक जयेश तन्ना आणि हनिता विवेक तन्ना अशी या पाच जणांची नावे आहेत. यातील जयेश तन्ना हा व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे अनेकांना फ्लॅटच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. त्याच्याविरुद्ध दहा ते पंधराहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे बोलले जाते.

 विनोद नारायणदास पंजाबी हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील न्यू लिंक रोड, रेहजा क्लासिक इमारतीच्या फ्लॅट क्रमांक १०१५ मध्ये राहतात. २०१३ रोजी त्यांना जयेश तन्ना याच्या मालकीच्या साईसागर कन्सलटंन्स या कंपनीकडून अंधेरीतील गणेश चौक, भवन्स हॉटेल्स परिसरात द नेस्ट इमारतीचे बांधकामाची माहिती मिळाली होती. या इमारतीमध्ये त्यांना एक फ्लॅट घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी जयेश तन्नाची भेट घेऊन फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर त्यांनी तिथे एक फ्लॅट बुक केला होता. याच फ्लॅटसाठी त्यांनी जयेश तन्नाला ३ कोटी ३४ लाख रुपयांचे पेमेंट केले होते.

या पेमेंटनंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. मात्र करारात नमूद केलेल्या मुदतीत त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यांनी दिलेल्या फ्लॅटचा परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन त्यांची फसवणुक केली ोती. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी जयेश तन्नाकडे त्यांच्या पैशांची मागणी केली होती. मात्र पैसे न देता जयेशने त्यांची फसवणुक केली. त्यामुळे त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक जयेश तन्ना, दिप तन्ना, श्रद्धा तन्ना, विवेक तन्ना आणि हनिता तन्ना यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर या पाचही संचालकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. जयेश आणि दिप तन्ना यांनी अशाच प्रकारे अनेकांना फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. याच गुन्ह्यांत जयेश तन्नाला बोरिवली, कांदिवली, डि. एन नगरसह इतर पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून लवकरच त्याचा आंबोली पोलिसांकडून ताबा घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in