महाराष्ट्र सरकार कडुन एमआरव्हीसीला ३०० कोटीचा निधी

महाराष्ट्र सरकार कडुन एमआरव्हीसीला ३०० कोटीचा निधी

मुंबईतील रेल्वे प्रकल्प पुन्हा रुळावर आले आहेत. महाराष्ट्र सरकारने मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला आवश्यक असलेल्या १ हजार कोटी रुपयांपैकी आणखी १५० कोटी रुपये दिले आहेत. याआधी मागील आठवड्यातच १५० कोटी रुपये शासनाकडून देण्यात आले होते. दरम्यान, २ आठवड्यांतील सलगच्या निधीमुळे एमआरव्हीसीच्या रखडलेल्या प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत.

गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारकडून अपेक्षित १ हजार कोटी रुपयांचा निधी अद्याप मिळालेला नाही. परिणामी एमआरव्हीसीच्या एमयूटीपी २ आणि ३ मधील प्रकल्पांची कामे कासवगतीने सुरू आहेत. दरम्यान, याबाबत बैठका सुरु असताना या प्रकल्पांसाठी एमआरडीएकडून मागील आठवड्यात केवळ १५० कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली आहे; मात्र अनेक प्रकल्प कामे शिल्लक असताना तुटपुंज्या रकमेने कोणते काम सुरु करायचे असा प्रश्न एमआरव्हीसीला पडला होता. अखेर शासनाने मंगळवार १७ मे रोजी निधीचा दुसरा भाग जारी करत दोन आठवड्यात एकूण ३०० कोटी एमआरव्हीसीला देऊ केले आहेत.

यामुळे प्रकल्पांना चालना देता येणार असून कंत्राटदारांची प्रलंबित देणी आणि पुढील कामासाठी पैसे वितरीत करणे शक्य होणार असल्याचे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर एमयूटीपी २ आणि ३ अंतर्गत विविध रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. एमयूटीपी २ मध्ये सीएसएमटी ते कुर्ला पाचवा, सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, एमयूटीपी ३ मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल असे ११ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या इतर चालू असलेल्या रेल्वे प्रकल्पांना निधी देण्यासाठी आणखी ७०० कोटी रुपयांची प्रतीक्षा एमआरव्हीसीला करावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in