वांद्रे पश्‍च‍िम येथील बँडस्टँड परिसरातील भूखंड तीन हजार कोटींचा ;भाजप आमदार आशिष शेलार

वांद्रे पश्‍च‍िम येथील बँडस्टँड परिसरातील भूखंड तीन हजार कोटींचा ;भाजप आमदार आशिष शेलार

वांद्रे पश्‍च‍िम येथील बँडस्टँड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्‍डरच्‍या घशात घालून सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करण्‍यात आला आहे. विशेष बाब म्‍हणजे, या पंचतारांकित जागेवर ‘एसआरए’ योजना दाखवून याचा लाभ व एफएसआय बिल्‍डरला देण्‍यात येणार असल्‍याचा गंभीर आरोप भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी केला.

यापूर्वी शेलार यांनी या भूखंड घोटाळ्यात एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्‍याबाबत खुलासा उपनगर जिल्‍हाधिकाऱ्यांनी करून यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारे घोटाळा झाला नसल्‍याचा खुलासा केला होता. याच घोटाळयातील आणखी एक गंभीर बाब उघड करून नवीन आरोप केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात बँडस्टँड परिसरात असणाऱ्या ताज हॉटेलच्या शेजारील एक एकर पाच गुंठे भूखंड १९०५ पासून ‘द बांद्रा पारशी कॉन्वेलेसेन्ट होम फॉर वूमेन अॅण्ड चिल्ड्रेन चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेला भाडे पट्ट्यावर देण्यात आला होता. आजारी रुग्णांना बरे करण्यासाठी ही राखीव जागा या ट्रस्टला देण्यात आली असतानाही ट्रस्टने या जागेचा राखीव कामासाठी उपयोग केलाच नाही. दरम्यानच्या काळात १९८० साली या जागेचा भूखंड भाडेपट्टा संपला. मुंबई महापलिकेच्या २०३४च्या विकास आराखड्यात या जागेचे आरक्षण रिहॅबिलिटेशन सेंटर असे आहे. जागेचा भाडेपट्टा करार संपल्यामुळे ही जागा सरकारच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया होत असतानाच २०२० साली ही जागा विकण्याची जाहिरात काढण्यात आली. त्यानंतर २०२२ पर्यंत सरकारने ही जागा विकण्याच्या सर्व परवानग्या दिल्या.

चौकशी करण्याचे आदेश

या संपूर्ण प्रकरणात धर्मदाय आयुक्‍त, एसआरए, उपनगर जिल्‍हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका यांचा सहभाग असून या सर्व प्रशासकीय कार्यालयातून ज्‍या वेगाने परवानग्‍या देण्‍यात येत आहेत. ते पाहता मंत्रालयातील कोणी उच्‍च पदस्‍थच ही सूत्रे हलवित असल्याचे अधोरेखित होते. त्‍यामुळे तातडीने या प्रकरणाची चौकशी व्‍हावी. एसआरएकडून या भूखंडावरील योजनेला परवानगी देण्‍यात येऊ नये, अशी मागणीही आमदार शेलार यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in