
मुंबई : मुंबईकरांना सर्वोत्तम देण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाकडून विविध सेवा पुरवल्या जातात. त्यातच ‘बेस्ट’ने अलीकडेच सुरू केलेली प्रीमियम बस सेवा लोकांच्या पसंतीस उतरली आहे. सतत परराज्यात किंवा परदेशात दौरे करणाऱ्या नागरिकांनी वेगवान पद्धतीने धावणाऱ्या या बससेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मुंबई महानगर प्रदेशांमध्ये तसेच विमानतळ ते दक्षिण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या दरम्यान धावणाऱ्या या बससेवेला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बेस्टची ही प्रीमियम सेवा ‘बेस्ट’ ठरत आहे.
सद्यस्थितीत विविध मार्गांवर बेस्टच्या १०० बस धावत आहे. प्रत्येक बसमधून दिवसाला जवळपास ३ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. “पूर्वी कामावर जाणारा नोकरदार वर्ग खच्चाखच भरलेल्या बसऐवजी खासगी कारला पसंती देत होता. मात्र प्रीमियम बससेवेमुळे त्यांच्यासमोर सुलक्ष असा पर्याय उपलब्ध झाला आहे. खासगी कार किंवा कॅबऐवजी आता प्रीमियम बससेवेकडे नोकरदार वर्ग वळत असून त्यांना सुलभ आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे,” असे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “फक्त आरक्षण केलेल्या प्रवाशांसाठीच प्रीमियम बससेवेचे थांबे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे कमीत कमी ठिकाणी बस थांबता वेगवान पद्धतीने ऑफिसला पोहोचता येते. प्रीमियम बसमध्ये उभे राहून प्रवास करण्याला परवानगी नसल्यामुळे प्रवाशांना थंडगार एसीत सुखद प्रवासाचा अनुभव मिळत आहे.”
प्रीमियम बस सेवेतून प्रवास करताना कुलाब्यातील कुणाल जैन याने समाधान व्यक्त केले. तो म्हणाला की, “स्वस्त आणि मस्त प्रवासाचा अनुभव मला मिळाला. विशेष करून परदेश दौरे करणाऱ्यांसाठी ही सुविधा उत्तम आहे. आता प्रीमियम बससेवा ही विमानतळाच्या दरवाज्यापासून उपलब्ध झाली आहे.” ठाण्याच्या सुधा शाह यांनीही प्रीमियम बससेवेची स्तुती केली. त्याचबरोबर अशाचप्रकारची सेवा मुंबईकरांना विविध मार्गांवर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रीमियम सेवेचा विस्तार करण्याची मागणी
प्रवाशांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता, बेस्ट प्रशासनाला प्रीमियम बससेवेचा विस्तार शहरातील अन्य मार्गांवर करण्याची प्रेरणा मिळाली आहे. रस्त्यावरील खासगी वाहने कमी करण्यासाठी तसेच हरित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे अधिकाधिक लोकांनी वळावे, यासाठी बेस्ट प्रशासन सकारात्मक आहे.
या मार्गांवर धावते बस
बेस्टने गेल्यावर्षी प्रीमियम बससेवेची सुरुवात केली होती. वांद्रे-कुर्ला संकुल आणि मुंबई विमानतळावरून विविध ठिकाणी ही बससेवा चालवली जात होती. त्यांतर ही बससेवा आता ठाणे-बीकेसी, वांद्रे-बीकेसी, विमानतळ ते कफ परेड, विमानतळ ते खारघर, विमानतळ ते ठाणे, ठाणे ते पवई, ठाणे ते अंधेरी, गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी, खारघर ते बीकेसी, सीबीडी बेलापूर ते बीकेसी, गुंदवली मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट टर्मिनल २, गुंदवली मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट टर्मिनल १ अशा मार्गांवर चालवली जात आहे.
या सुविधा उपलब्ध
प्रीमियम बससेवेत प्रवाशांना विविध प्रकारच्या सोयीसुविधांसह प्रवास करता येते. सामान ठेवण्यासाठी जागा, यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, ऑनबोर्ड वायफाय तसेच अखंड प्रवासाचा सुखद अनुभव प्रवाशांना घेता येतो. त्याचबरोबर प्रवाशांना ‘चलो बस’ या मोबाईल ॲॅपवरून आधीच आपले तिकीट बुक करता येते.