मुंबई : धावपळीच्या जीवनात सृदृढ आरोग्यासाठी योगा उत्तम व्यायाम आहे. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत, मुंबई महापालिकेने शिव योगा केंद्र सुरू केले. पालिकेच्या शिव योगा केंद्रात दोन वर्षांत ३१ हजार ६२३ लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याने सृदृढ आरोग्यासाठी शिव योगा केंद्र आरोग्यदायी ठरत आहे.
उत्तम आरोग्यासाठी योगा हा उत्तम व्यायाम असून २०२४ मध्ये योग स्वत:साठी, समाजासाठी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. दरम्यान, २१ जून म्हणजेच योग दिनानिमित्त मुंबईत १०० प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले आहे.
मुंबईतील नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचे तसेच दर्जेदार जीवनशैलीसाठी शिव योगा केंद्रांची ज्याठिकाणी मागणी आहे, अशा ठिकाणी नियमितपणे प्रशिक्षण वर्ग घेण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. योगा प्रशिक्षणाचे वर्गाच्या ठिकाणी नागरिकांना नियमितपणे प्रशिक्षण उपलब्ध होईल, यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या होत्या. संपूर्ण मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीला एकूण ११६ शिव योग केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या ठिकाणी प्रत्येकी एक यानुसार ११६ योग प्रशिक्षक कार्यरत आहेत. सध्या ४ हजार २७८ लाभार्थी योग प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच जून २०२२ पासून ते मे २०२४ अखेरीपर्यंत ३१ हजार ६२३ लाभार्थ्यांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या संकल्पनेत शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्य याला महत्व दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच जीवनशैलीशी निगडित मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधोपचारांच्या सोबतच आरोग्यदायी जीवनशैली व योगा मुळे त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. वर्ष २०२२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संपूर्ण मुंबईत विभाग स्तरावर शिव योगा केंद्रे सुरू केली आहेत.