जीएसबी मंडळाने उतरवला ३१६.४० कोटींचा विमा

किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे.
 जीएसबी मंडळाने उतरवला ३१६.४० कोटींचा विमा

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस राहिलेले असतानाच संपूर्ण मुंबईत मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. भव्य मूर्ती, आकर्षक विविध देखावे, सजावट पाहायला भाविक एकच गर्दी करतात. आपला देखावा अन्य मंडळांपेक्षा वेगळा असावा, असाच त्यांचा प्रयत्न असतो. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ असलेल्या जीएसबी सेवा मंडळाने आपल्या संपूर्ण मालमत्तेचा व भक्तांचा प्रचंड रकमेचा विमा उतरवून विक्रम केला आहे. या मंडळाने आपल्या यंदाच्या गणेशोत्सवाचा ३१६.४० कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.

किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेला गणपती बघण्यासाठी मोठी गर्दी असते. कोणतीही आपत्ती कधीही सांगून येत नाही. त्यामुळे या मंडळाने आपल्या सर्व मालमत्तेचा १० दिवसांसाठी विमा उतरवला आहे. विशेष म्हणजे, येणाऱ्या प्रत्येक भक्तालाही विम्याचा लाभ मिळणार आहे, अशी तरतूद केली आहे.

जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय कामत म्हणाले की, “कोणत्याही मंडळापेक्षा आमच्या मंडळाने आतापर्यंत सर्वाधिक विमा कवच घेतले आहे. ३१६.४० कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. त्यात ३१.८७ कोटी रुपयांचा विमा सोने, चांदी व अन्य मौल्यवान वस्तूंसाठी उतरवला आहे. तर मंडप, स्वयंसेवक, भटजी, आचारी, चप्पल सांभाळणारे कर्मचारी, पार्किंग करणारे कर्मचारी व सुरक्षारक्षकांचा २६३ कोटींचा विमा उतरवला आहे. तसेच आगीचा एक कोटीचा विमा आहे. त्यात भूकंपाचा समावेश केला आहे. तसेच फर्निचर, फिटिंग्ज, संगणक, सीसीटीव्ही, स्कॅनर आदींना विमा संरक्षणाच्या कक्षेत घेतले आहे.

आम्ही आमच्या विम्यात प्रत्येक संभाव्य नुकसानीची तरतूद केली आहे. मंडळाच्या मंडपात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विम्याचे संरक्षण दिले आहे. आमचे गणेशोत्सव मंडळ हे सर्वात जास्त शिस्तबद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे कामत यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in