स्वच्छ मुंबईसाठी ३२ कॉम्पॅक्टर वाहने सेवेत

या वाहनांमध्ये नव्या कॉम्पॅक्टर वाहनांची भर पडली आहे कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार
स्वच्छ मुंबईसाठी ३२ कॉम्पॅक्टर वाहने सेवेत
Published on

मुंबई : मुंबईत दररोज निर्माण होणारा ६ हजार २५ मेट्रिक टन इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा हा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून उचलला जातो. मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होणारा कचरा कॉम्पॅक्टर वाहनाच्या माध्यमातून वाहून नेला जातो. मुंबईकरांच्या सेवेत नव्याने आणखी ३२ कॉम्पॅक्टर वाहने दाखल झाली आहेत. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी कचरा वाहून नेण्याची यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे सुरू राहण्यासाठी मदत होईल. आयुर्मान पूर्ण झालेल्या वाहनांना बदली म्हणून ही वाहने आता घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.

मुंबईतील सर्व विभागातून सहा हजार मेट्रिक टन कचरा कांजूर व देवनार क्षेपणभूमी येथे पाठवला जातो. सरासरी ८०० मेट्रिक टन कचरा देवनार क्षेपणभूमी येथे पाठविण्यात येतो. दैनंदिन कचरा, गाळ आणि राडारोडा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण वाहनांमध्ये २४६ महानगरपालिकेची वाहने तर ठेकेदारांची १६९४ वाहने वापरण्यात येतात. या वाहनांमध्ये नव्या कॉम्पॅक्टर वाहनांची भर पडली आहे. दैनंदिन कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी नव्याने ३२ कॉम्पॅक्टर वाहने ताफ्यात दाखल झाल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली. मुंबईतील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अधिक गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम सेवा देण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे यांनी दिली.

शहर व दोन्ही उपनगरात वाहनांची उपलब्धता!

एका कॉम्पॅक्टर वाहनाच्या माध्यमातून सध्या ६ मेट्रिक टन कचरा नेण्यात येतो. ३२ कॉम्पॅक्टर वाहनांपैकी शहरासाठी ६, पश्चिम उपनगरे ११ आणि पूर्व उपनगरासाठी १५ वाहने उपलब्ध झाली आहेत.

कचऱ्याच्या ५०२३ तक्रारी

मुख्‍यमंत्री स्‍वच्‍छ मुंबई व्‍हॉटसॲॅप हेल्पलाईनवर जुलै अखेरीपर्यंत ५१६२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी घनकचरा विभागाशी संबंधित ५०२३ तक्रारी आल्या होत्या. तक्रारींपैकी ५०१८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर १३९ तक्रारी या कचऱ्याशी संबंधित नव्हत्या.

logo
marathi.freepressjournal.in