साकीनाक्यातील इमारतीत अग्नितांडव नवजात शिशूसह ३३ जण थोडक्यात बचावले

मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी व पोलीस पुढील तपास करीत आहेत.
साकीनाक्यातील इमारतीत अग्नितांडव नवजात शिशूसह ३३ जण थोडक्यात बचावले

मुंबई : साकीनाका डिसोझा कंपाऊंड, ९० फूट रोड येथील तळ अधिक पाच मजली साकी सोसायटीच्या मीटर बॉक्सला शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळात या आगीचे रौद्ररूप धारण केले. इमारतीत धुराचे लोट पसरल्याने रहिवासी इमारतीतच अडकले. इमारतीचे टेरेस बंद होते. मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घरातच अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बाल्कनीच्या ग्रील कापून जवानांनी चित्तथरारक बचाव मोहीम यशस्वी केल्याने मुंबई अग्निशमन दलातील जवानांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, रेस्क्यू ऑपरेशनमध्ये दोन नवजात शिशूसह ३३ जणांना वेळीच रेस्क्यू केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, ही इमारत ३० वर्षं जुनी असून इमारतीत अग्निशमन यंत्रणा नव्हती, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.

साकी सोसायटीच्या तळ मजल्यावरील मीटर बॉक्समध्ये ठिणगी उडाली आणि काही क्षणात आग वाऱ्यासारखी पसरली. इमारतीत धुराचे लोट पसरले. यावेळी इमारतीत नवजात शिशूसह महिला, पुरुष असे ३३ जण अडकले होते. मुंबई अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. दोन मुलींसह दोन नवजात शिशू, ५ महिला, ७ पुरुषांना दुसऱ्या मजल्यावरून, दोन महिला, ६ पुरुष व दोन मुलांना तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरून, ४ पुरुष, ३ महिलांना पहिल्या मजल्यावरून रेस्क्यू केल्याचे आंबुलगेकर यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची स्थानिक पालिकेचे अधिकारी, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी व पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले असून वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यामुळे अदानी इलेक्ट्रिकसिटीला कळवले असून अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच या घटनेत कोणीही जखमी झाले नसून पुढील तपास स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत, असे एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हालेकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in