२०२६पर्यंत मेट्रोचे ३३७ किमी नेटवर्क;मुंबई मेट्रोपॉलिटन परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वेगळे आहेत.
२०२६पर्यंत मेट्रोचे ३३७ किमी नेटवर्क;मुंबई मेट्रोपॉलिटन परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

“राज्यातील सरकार बदलले आहे. आम्हाला मुंबई वाहतूक कोंडीमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त करायची आहे. मुंबईला सर्वोत्तम शहर बनवण्याची हीच वेळ आहे. २०२६पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो रेल्वेचे ३३७ किमी नेटवर्क विकसित केले जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच कन्स्ट्रक्शन टाइम्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई मेट्रोपोलिटन रिजन २०३४’ या एकदिवसीय परिषदेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेत विविध सरकारी प्राधिकरणांच्या आणि तज्ज्ञांच्या वतीने पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विस्तृत चर्चा करण्यात आली.

“महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वेगळे आहेत. ही एकात्मिक प्रणाली नाही; परंतु आम्ही भविष्यात ती एकत्रित करण्याचा विचार करत आहोत. आम्ही पूर्व मुक्त मार्ग घोडबंदरपर्यंत नेणार आहोत. मेट्रो ३मध्ये काही अडचणी होत्या; पण त्या दूर करण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात मुंबई महानगर क्षेत्रात अनेक बदल पाहायला मिळतील. सर्व मोठे प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण होतील. खड्डे बुजवण्याबाबत बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईत ४५०० कोटी रुपयांचे काँक्रीटचे रस्ते नव्याने बांधले जातील,” असे शिंदे यांनी सांगितले.

“आमचे सरकार लक्ष्याभिमुख आहे. बिल्डरांनी मुंबईत परवडणारी घरे द्यावीत, त्यासाठी आम्ही प्रोत्साहनही देऊ. नियम आणि कायद्यात दुरुस्ती करायची असल्यास तीही केली जाईल. तसेच मुंबईतील १४५ कोळीवाड्यांचा पुनर्विकास त्यांना विश्वासात घेऊन केला जाईल,” असे शिंदे म्हणाले.

मुंबईला जगातले सर्वोत्तम शहर बनवायचे आहे

मुंबई शहराला जगातले सर्वोत्तम शहर बनवायचे असून त्यासाठी सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईसह महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध संस्थांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्याने काम केल्यास विकासाला अधिक चांगली गती मिळू शकेल. याच उद्देशाने आयोजित केलेल्या या एक दिवसीय परिषदेत सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ मंडळींनी पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विस्तृत चर्चा केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in