रस्त्यांच्या धुलाईसाठी ३५० टँकर; आयुक्तांचे घनकचरा व्यवस्थापन विभागाला निर्देश

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यांवरील धूळ कारणीभूत असल्याचे समोर आले
रस्त्यांच्या धुलाईसाठी ३५० टँकर; आयुक्तांचे घनकचरा व्यवस्थापन विभागाला निर्देश
Published on

मुंबई : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने आता रस्त्यांच्या धुलाईसाठी ३५० टँकर्सचा वापर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत पालिका व कंत्राटदाच्या माध्यमातून १०० टँकर्सद्वारे रस्ते धुलाई सुरू असून प्रत्येक वॉर्डात १० टँकर्स वाढवण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. या टँकरच्या माध्यमातून पालिकेच्या अखत्यारितील दोन हजार किमी रस्त्यांपैकी एक हजार किमी रस्ते दररोज धुतले जाणार आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यांवरील धूळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांना गती दिली आहे. पालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. सद्यस्थितीत यातील सुमारे ७०० किमी रस्ते धुतले जात आहेत. आता दररोज एक हजार किमी रस्ते धुवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुनर्प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर

रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या आणि स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत नाही. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये (ऑफ-पीक अवर्स) विशेषत: पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्ते धुण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात हे काम केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in