Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू

Flamingos Found Dead In Mumbai: मुंबईतील घाटकोपर परिसरात विविध ठिकाणी ३७ फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळून आले आहेत.
36 Flamingos Found Dead In Mumbai
X

Emirates Flight Hit Flamingos: मुंबईच्या घाटकोपर परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला विमानाची धडक बसल्यामुळे तब्बल ३७ फ्लेमिंगो ठार झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW) ने याबाबत पीटीआयला माहिती दिली. सध्या मृत्यूचे कारण विमानाशी पक्ष्यांची टक्कर असे सांगितले जात आहे, पण, शवविच्छेदनानंतर याची पुष्टी होईल.

मृत्यूमागील संभाव्य कारण काय ?

प्राथमिक माहितीनुसार, एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाची धडक फ्लेमिंगोंच्या थव्याला बसल्याचे सांगितले जात आहे. अद्याप एमिरेट्सकडून याबाबत माहिती देण्यात आलेली नसली तरी, थोड्यावेळात ते अधिकृत निवेदन जारी करणार असल्याचे समजते. धावपट्टीवर लँडिंगच्या तयारीसाठी विमान खाली आल्यानंतर ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. या घटनेत फ्लेमिंगो पक्ष्यांचा अख्खा थवा मृत्युमुखी पडल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

घाटकोपर हे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असलेले उपनगर आहे. दिवसभर आणि रात्रीही या भागावर मोठ्या प्रमाणात विमाने उडत असतात. त्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घाटकोपरमध्ये निरनिराळ्या ठिकाणी मृतावस्थेत पक्षी पडले असल्याचे अनेक फोन आले होते. याबाबत माहिती देताच वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलने तात्काळ पावले उचलत RAWW पथकांसह शोध मोहीम सुरू केली आणि सोमवारी रात्री त्यांना अनेक मृत फ्लेमिंगो आढळले, असे RAWW चे संस्थापक पवन शर्मा आणि वन विभागाचे वन्यजीव वॉर्डन यांनी 'पीटीआयला'ला सांगितले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पर्यावरण, प्राणी आणि पक्ष्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने घाटकोपरमधील फ्लेमिंगोच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पक्षीप्रेमीही या घटनेमुळे हळहळले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in