जीएसबी गणेश मंडळाचा ३६०.४० कोटींचा विमा

यंदा मंडळाचे ६९ वे वर्षे असून मंडळ आपल्या जुन्या परंपरांवर कायम आहे
जीएसबी गणेश मंडळाचा ३६०.४० कोटींचा विमा

मुंबई : मुंबईतील श्रीमंत गणेशोत्सव म्हणून ओळख असलेल्या किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाच्या गणपती मंडळाने यंदा संपूर्ण उत्सवाचा ३४०.४० कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.

गणपतीचे दागिने, मंडप, नैसर्गिक आपत्ती, स्वयंसेवक, वैयक्तिक विमा आदींचा विमा उतरवला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ४० कोटी रुपये अधिक रकमेचा विमा उतरवला आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी आम्ही हवन करणार आहोत. गणपतीसाठी यंदा आम्ही अधिक दागिने केले आहेत. त्यासाठी आम्हाला देणगीदारही मिळालेले आहेत. २५० ग्रॅम सोने तसेच चांदी वापरली जाणार आहे, असे जीएसबी सेवा मंडळाचे प्रवक्ते अमित पै यांनी सांगितले.

जीएसबी मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना १७ सप्टेंबरला होणार आहे, तर १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाईल. यंदा दागिन्यांचे मूल्य वाढले आहे. त्यामुळे विम्याच्या रकमेचा आकारही वाढलेला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष विजय कामत यांनी सांगितले. गेल्यावर्षी ३१६ कोटींचा विमा उतरवला होता. त्यात ६७ किलो सोने व चांदी ३०० किलो होती. मंडळातर्फे दोन गण होम करणार आहे. यातील एक चांद्रयान-३ साठी असेल.

प्रसाद, पूजा बुकिंगसाठी यंदा क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. तसेच यंदा मंडपात चेहरा ओळख सुरक्षा यंत्रणा राबवली जाईल, असे कामत म्हणाले.

यंदा मंडळाचे ६९ वे वर्षे असून मंडळ आपल्या जुन्या परंपरांवर कायम आहे. त्याच पद्धतीने हा उत्सव साजरा केला जाईल. त्यात गणेश मूर्ती व उत्सव हा पर्यावरणस्नेही असेल. भाविकांना केळीच्या पानातून प्रसादाचे वाटप केले जाईल. तसेच आमच्या मंडळात अहोरात्र धार्मिक विधी सुरू असतात. हे करणारे आमचे एकमेव मंडळ आहे.

logo
marathi.freepressjournal.in