मुंबईत ३७१ टन सुपारी जप्त

सुपारीची तस्करी करण्याकडे कल वाढला आहे.
मुंबईत ३७१ टन सुपारी जप्त

मुंबई : महसूल विभागाच्या गुप्तहेर संचालनालयाने मुंबईत तस्करी करण्यात आलेली तब्बल ३७१ टन सुपारी जप्त केली आहे. या सुपारीचे एकूण मूल्य ३२ कोटी रुपये आहे. एकूण १४ कंटेनरमधून ही सुपारी आयात करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये ही फोडलेली सुपारी आयात करण्यात आली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी जेएनपीटी बंदरातून तळेगांवला जाण्यासाठी सज्ज असलेले हे कंटेनर अडवण्यात आले होते. कागद पत्रांनुसार या कंटेनरमधून कॅल्शिअम नायट्रेट आयात करण्यात आले होते. मात्र तपासाअंती या सर्व १४ कंटेनरमध्ये सुपारी होती. केंद्र सरकारने सुपारीच्या आयातीवर प्रतिटन १०३७९ डॉलर आयात शुल्क लागू केले आहे. त्यानुसार १४ कंटेनरमधील ३७१ टन सुपारीचे मूल्य ३२.३१ कोटी रुपये आकारण्यात आले आहे. देशात फोडलेली सुपारी आयात करण्यावर एकूण मूल्याच्या ११० टक्के आयात शुल्क आकारले जाते. यामुळे सुपारीची तस्करी करण्याकडे कल वाढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in