मान्सूनसाठी दोन्ही रेल्वे सज्ज! पाणी साचणाऱ्या ठिकाणी ३९६ पंप, संवेदनशील पुलांवर प्लस आधारित जलपातळी निरीक्षण प्रणाली

पावसाळ्यात अखंडित रेल्वेसेवा सुरू ठेवण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने विविध कामे वेळेत पूर्ण केली आहेत. तर संवेदनशील पुलांवर प्लस रडार आधारित जलपातळी देखरेख यंत्रणा उभारण्यात आली आहे.
मान्सूनसाठी दोन्ही रेल्वे सज्ज! पाणी साचणाऱ्या ठिकाणी  ३९६ पंप, संवेदनशील पुलांवर प्लस आधारित जलपातळी निरीक्षण प्रणाली
प्रातिनिधिक फोटो
Published on

मुंबई : पावसाळ्यात अखंडित रेल्वेसेवा सुरू ठेवण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने विविध कामे वेळेत पूर्ण केली आहेत. तर संवेदनशील पुलांवर प्लस रडार आधारित जलपातळी देखरेख यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्यामध्ये नदीच्या पाण्याची पातळीचे निरीक्षण करण्यासाठी इंटेलिजंट फिल्ड डिव्हाईससारख्या उपकरणांमार्फत दर १५ मिनिटांनी पाण्याच्या पातळीचा डेटा जीपीआरएसद्वारे प्राप्त करण्यात येणार आहे. तर पाणी साचणाऱ्या असुरक्षित ठिकाणांवर ३९६ उच्च क्षमतेचे पंप बसविण्यात आले आहेत.

पावसाळ्यात रेल्वे सुरळीत सुरू राहावी, यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेने ट्रॅक, यांत्रिक, सिग्नलिंग, विद्युत उपकरणे इत्यादींच्या देखभालीवर विशेष भर दिला आहे. पुराची शक्यता असणाऱ्या जोखीम प्रवण क्षेत्रांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले आहे. ६५१ कल्व्हर्ट्स आणि ३२३ किलोमीटरचे नाले गाळमुक्त आणि साफ करण्यात आले आहेत. यार्डमधील पाण्याच्या प्रवाहाच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. यार्डामध्ये पाण्याच्या सुरळीत विसर्ग करण्यासाठी नवीन नाल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर ११ पेक्षा अधिक ठिकाणी मायक्रो टनलिंग करण्यात आले आहे. वांद्रे आणि बोरिवली येथील कल्व्हर्ट्सची साफसफाई करण्यासाठी सक्शन डी स्लजिंग मशीनचा वापर करण्यात आला आहे. पोकलेन, जेसीबी मशिन्सद्वारे ३ लाख क्युबिक मीटर्सपेक्षा अधिक गाळ, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच रिमोट ऑपरेटेड फ्लोटर कॅमेरे

मॅन्युअल नियंत्रण करण्यास कठीण असलेल्या कल्व्हर्ट‌्स आणि पुलांचे छायाचित्र टिपण्यासाठी रिमोट ऑपरेटेड फ्लोटर कॅमेऱ्यांचा वापर पश्चिम रेल्वेने सुरू केला आहे. भारतीय रेल्वेमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीची ही पहिलीच वेळ आहे. कमी प्रकाशाच्या परिस्थितीमध्येही भूमिगत कल्व्हर्ट‌्सच्या स्पष्ट प्रतिमा घेण्यासाठी हे कॅमेरे वापरण्यात येतात. त्यानंतर छायाचित्रांचा वापर या कल्व्हर्ट‌्सच्या स्वच्छतेसाठी केला जातो.

पॉईंट मशीनचे बिघाड रोखण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय

मध्य रेल्वेने पूर परिस्थितीदरम्यान पॉईंट मशीनचे बिघाड रोखण्यासाठी मशीन कव्हर विकसित केले आहेत. हे कव्हर २३१ पूरप्रवण ठिकाणी लावण्यात आले आहेत. यामुळे ट्रेनचे संचालन सुरळीत होणार आहे.

इतर उपाययोजना

< पावसाचा अचूक डेटा प्राप्त करण्यासाठी १४ स्वयंचलित प्रजन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.

< ९८ ठिकाणी फ्लड गेज प्रदान करण्यात आले आहेत.

< असुरक्षित झाडांची छाटणी करण्यात आली आहे.

< सर्व ईएमयू रेकची तपासणी करण्यात आली आहे.

< ट्रक परिस्थितीच्या देखरेखीसाठी पेट्रोलमॅन आणि ब्रिज गाईड्सद्वारे मान्सून पेट्रोलिंग करण्यात येत आहे.

रेल्वेद्वारे महापालिकेसोबत समन्वय

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार दोन्ही रेल्वेद्वारे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी समन्वय राखण्यात येणार आहे. कचरा आणि सांडपाणी याची रेल्वेजवळील वस्ती आणि झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी महापालिका संस्थांना रेल्वेने सूचना केली आहे. भरती आहोटी आणि मुसळधार पावसाच्या दिवसांमध्ये विशेष वेळापत्रक अवलंबण्यात आले आहे. पूल आणि रुळांवर परिणाम करणाऱ्या धरणांमधून पाणी सोडले जात असताना रेल्वेला वेळेवर सूचना देण्याबाबत महापालिकांना कळविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in