मुंबईच्या नागरी व्यवस्थापनासाठी ‘थ्री डी मॅपिंग’; जीओ तंत्रज्ञानाचा वापर; अश्विनी भिडे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईच्या नागरी व्यवस्थापनासाठी ‘थ्री डी मॅपिंग’; जीओ तंत्रज्ञानाचा वापर; अश्विनी भिडे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : अतिक्रमण, आपत्ती व्यवस्थापन, नागरी नियोजन यासाठी आता मुंबईत ‘थ्री डी मॅपिंग’ करण्यात येणार आहे. जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हे थ्री डी मॅपिंग (डिजीटल ट्वीन) केले जाणार आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते थ्री डी मॅपिंगचा शुभारंभ करण्यात आला.

मुंबईतील सर्व २५ प्रशासकीय विभागांचे मिळून ५०० चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट असेल. या प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्य जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि वेरिटास (इंडिया) लिमिटेड यांच्याकडून संयुक्तपणे पुरविण्यात येत आहे. मुंबईत सुनियोजनबद्ध विकास आणि देखभाल सहज, सोपी, सुलभ व्हावी या अनुषंगाने मुंबईचे हुबेहुब डिजीटल मॉडेल अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून मुंबईचे थ्री डी मॅपिंग करण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे.

"आगामी तीन वर्षांसाठी हे थ्री डी मॅपिंग (डिजीटल ट्वीन) आणि त्याच्याशी संबंधित माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारीही या कंपन्यांकडे असणार आहे. विविध भागधारक आणि संबंधित संस्थांसोबत योग्य नियोजन करतानाच मुंबईसाठीचा सर्वसमावेशक असे डिजीटल प्रतिरुप तयार झाल्यानंतर महानगराचा सुनियोजित विकास तसेच त्याच्यावर देखरेख करणे अतिशय सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. कारण याद्वारे अचूक नागरी नियोजन करता येईल. यामध्ये पायाभूत सुविधा विकास, आपत्ती व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन व प्रतिबंध यासारख्या बाबी सोप्या होतील."- शरद उघडे, माहिती संचालक (माहिती तंत्रज्ञान)

logo
marathi.freepressjournal.in