मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर साडेचार वर्षांत ४०० बळी

जड वाहनांची हलक्या वाहनांच्या लेनमध्ये घुसखोरी हेही अपघाताचे मुख्य कारण आहे
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर साडेचार वर्षांत ४०० बळी

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातांच्या घटनांना उजाळा मिळाला आहे. २०१८पासून आतापर्यंत साडेचार वर्षांत येथे ३३७ प्राणांतिक अपघातांच्या नोंदी झाल्या असून, त्यात सुमारे ४०० जणांना आपले प्राण गमावले लागले, तर २६५ अपघातांत ६२६ जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालविणे, हा यामुळे हे अपघात घडत आहेत. जड वाहनांची हलक्या वाहनांच्या लेनमध्ये घुसखोरी हेही अपघाताचे मुख्य कारण आहे. मेटे यांच्या गाडीला झालेला अपघात याच प्रकारातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक पोलिसांकडून वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रतितास १०० किलोमीटर वेगाने वाहन चालवण्यास अनुमती आहे. हीच वेगमर्यादा घाट परिसरात २० किलोमीटर प्रतितास आहे; मात्र या नियमाचे वाहनचालकांकडून सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध महामार्ग पोलीस इंटरसेप्टर वाहनांवरील सीसीटीव्ही, तसेच स्पिडगनच्या माध्यमातून कारवाई करतात. आतापर्यंत करोडो रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तरीही वाहनचालक या कारवाईला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. जड आणि हलक्या वाहनांसाठी मार्गिका आखून दिल्या आहेत; मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. विशेषतः अवजड वाहने सर्रास याचे उल्लंघन करत हलक्या वाहनांच्या मार्गिकेतून जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in