देशभरात रेल्वेचे ४१ हजार कोटींचे प्रकल्प; पंतप्रधानांनी दूरस्थ पद्धतीने केले भूमिपूजन

या भूमिपूजन समारंभात पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारत हे तरुणांचे स्वप्न आहे. भविष्यातील भारत कसा असायला हवा
देशभरात रेल्वेचे ४१ हजार कोटींचे प्रकल्प; पंतप्रधानांनी दूरस्थ पद्धतीने केले भूमिपूजन
Published on

मुंबई : देशातील रेल्वे स्थानकांचा आमूलाग्र विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशनांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेत मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते २ हजार रेल्वे पायाभूत सुविधांचे भूमिपूजन झाले. या सर्व प्रकल्पांची किंमत ४१ हजार कोटी रुपये आहे.

यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते १५८५ रोड ओवर ब्रिजेस तसेच भूमिगत मार्गिकांच्या निर्मितीसाठी बांधकामाच्या कोनशिलांचे अनावरण झाले. भायखळा रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा तसेच पालकमंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव उपस्थित होते. महाराष्ट्रातील ५६ रेल्वे स्थानके आणि १९२ रेल्वे ओव्हर ब्रिज आणि भूमिगत मार्गिकांच्या नूतनीकरणाचा या योजनेत समावेश केल्याबद्दल राज्यपालांनी केंद्राचे आभार मानले.

या भूमिपूजन समारंभात पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारत हे तरुणांचे स्वप्न आहे. भविष्यातील भारत कसा असायला हवा, याचा विचार तरुणांनी करायला हवा. तुमचे स्वप्न हा माझा संकल्प आहे. भारतीय रेल्वेत सध्या व्यापक बदल होत आहेत. जे सध्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल. देशातील करदात्यांचा प्रत्येक पैसा हा प्रवाशांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे. सरकारतर्फे प्रत्येक रेल्वे तिकीटामागे ५० टक्के सवलत दिली जाते, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

मुंबईतील या स्थानकांचा होणार विकास

मुंबईतील मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड, पालघर, भायखळा, चिंचपोकळी, सँहडर्स्ट रोड, वडाळा, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा आदी स्थानकांचा विकास होणार आहे. प. रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या विकासात २३३ कोटी रुपये खर्च होणार आहे. उपनगरीय रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुनर्विकास केला जात आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या मागण्या वाढत आहेत. त्या पूर्ण करण्याच्या हेतूने नवीन पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in