
मुंबई बिटकॉईनच्या गुंतवणुकीवर भरमसाठ परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ४२ वर्षांच्या व्यक्तीची अज्ञात महिलेने सुमारे दोन लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जेनीफर स्मिथ नाव सांगणार्या महिलेविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
४२ वर्षांचे तक्रारदार सांताक्रुज येथे राहत असून मुलुंच्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी १ सप्टेंबरला घरी असताना त्यांना जेनिफर स्मिथ नावाच्या एका महिलेचा मॅसेज आला होता. तिने ती बिटकॉईनमध्ये व्यवसाय करत असून त्यांना त्यात गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना काही दिवसांत भरमसाठ परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. तिच्या आमिषाला बळी पडून त्यांनी तिच्याकडे काही रक्कमेची गुंतवणुक केली होती. ही रक्कम गुंतवणुक केल्यानंतर त्यांच्या खात्यात चांगला परतावा आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांत सुमारे दोन लाखांची गुंतवणुक केली होती. यावेळी तिने त्यांना आणखीन पैसे गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी आधीच्या गुंतवणुकीवरील पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती. मात्र तिने ती रक्कम ट्रान्स्फर केली नाही. नंतर तिचा मोबाईल क्रमांक बंद येत होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांत जेनिफर स्मिथविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला आहे.