
मुंबई : पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर पाण्याच्या निर्मितीसाठी मुंबई महापालिकेला प्रती किलो लिटरसाठी ४२ रुपये ५० पैसे खर्च करावे लागणार आहे. रोज ४०० दशलक्ष लिटर पाणी निर्मिती करण्यात येणार असून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रति किलो लिटरसाठी ३२ रुपये २० पैसे खर्च येणार आहे. ही किंमत पारंपरिक जल स्त्रोताच्या जवळपास असून पारंपरिक स्त्रोताचा पिण्याच्या पाण्याचा उत्पादकता खर्च प्रति किलो लिटरसाठी ३० रुपये असेल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे पालिकेतर्फे मनोरी येथील समुद्र किनाऱ्याजवळ समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात पहिल्याच टप्प्यात ३,५०० कोटीचा खर्च तब्बल ८,५०० कोटींच्या घरात गेला आहे. प्रकल्पाचा बांधकाम खर्च, प्रचालन व परिरक्षण आणि विजेच्या वापराचा हा एकूण खर्च आहे. २०० दशलक्ष लिटर प्रकल्पाचा बांधकाम खर्च १,६०० कोटी आणि २० वर्षांचा प्रचालन व परिरक्षण खर्च १९२० कोटी रूपये असा एकूण ३,५२० कोटी अंदाजित केला आहे. यामध्ये सुमारे ७,५०० कोटी इतका २० वर्षांसाठी विजेचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे.
चेन्नई, मुंबईच्या प्रकल्पात तफावत!
चेन्नई व मुंबईतील खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पांची भौगोलिक स्थिती व निर्मिलेल्या पाण्याच्या निकषांमध्ये तफावत आहे. चेन्नई येथे हा प्रकल्प समुद्र सपाटीलगत असून मनोरी येथील प्रस्तावित प्रकल्प स्थळ समुद्रसपाटीपासून ३४ मीटर उंचीवर आहे. तसेच चेन्नईपेक्षा मुंबईतील सद्यस्थितीतील पाणी पुरवठयाची गुणवत्ता समतल राखण्यासाठी 'डबल पास आरओ'चा वापर करणे प्रस्ताविले आहे.