कारसाठी तिघांकडून घेतलेल्या ४४ लाखांचा अपहार चकांदिवलीसह गोवंडीत दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद

कारसाठी तिघांकडून घेतलेल्या ४४ लाखांचा अपहार चकांदिवलीसह गोवंडीत दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद

पेमेंटनंतर त्यांना ४५ दिवसांत कारची डिलीव्हरी होईल असे सांगण्यात आले होते

मुंबई : कारसाठी तिघांकडून घेतलेल्या सुमारे ४४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी दयानंद सुवर्णा या कार एजंटविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दयानंदविरुद्ध अशाच प्रकारे फसवणुक केल्याचा आरोप असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने आतापर्यंत एका महिलेसह वकिल आणि अन्य एका व्यक्तीची अशा तिघांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ५२ वर्षांचे तक्रारदार कांदिवली परिसरात राहत असून एका नामांकित कंपनीत कामाला आहेत. त्यांना महिंद्रा कंपनीची महिंद्रा एक्सयुव्ही कार खरेदी करायची होती. यावेळी त्यांच्या मैत्रिणीने त्यांना दयानंद सुवर्णा या कार एजंटची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी दयानंदला संपर्क साधून त्याला कारविषयी माहिती दिली होती. त्यानंतर त्याने त्यांना कांदिवलीतल एनबीएस इंटरनॅशनल या शोरुममध्ये बोलावून तिथे कारची माहिती दिली होती. कार खरेदी-विक्रीसाठी त्याने त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांना कारचे पेमेट करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याने त्याला सुमारे तेरा लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांना ४५ दिवसांत कारची डिलीव्हरी होईल असे सांगण्यात आले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कारची डिलीव्हरी केली नाही. वारंवार विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळून विविध कारणे सांगत होता. चौकशीदरम्यान दयानंदने त्यांची मैत्रिणीसह व्यवसायाने वकिल असलेल्या दोघांची अशाच प्रकारे सुमारे ३१ लाखांची फसवणुक केली होती. कारसाठी पेमेंट घेऊन कार न देता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. याप्रकरणी संबंधित वकिलाने त्याच्याविरुद्ध गोवंडी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध मे महिन्यांत गोवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दयानंद सुवर्णाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. दयानंदने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे दयानंदकडून फसवणुक झालेल्यांनी गोवंडी आणि कांदिवली पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in