मुंबईत तब्बल ४४ नर्सिंग होम बेकायदा ; ४२ नर्सिंग होम विरोधात गुन्हा दाखल

काही खासगी रुग्णालयांनी आरोग्य सेवेच्या नावाखाली दुकान थाटल्याचे आरोग्य विभागाच्या कारवाईतून समोर आले
मुंबईत तब्बल ४४ नर्सिंग होम बेकायदा ; ४२ नर्सिंग होम विरोधात गुन्हा दाखल

मुंबईत गल्लोगल्ली नर्सिंग होमच्या नावाखाली काही जणांनी दुकान थाटले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतील १,५७० नर्सिंग होमची झाडाझडती घेतली. यात तब्बल ४४ बेकायदा नर्सिंग होम सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी ४२ नर्सिंग होम व्यवस्थापना विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नर्सिंग होम म्हणजे काही जणांसाठी कमाईचे साधन झाले आहे.

मुंबई महापालिका व सरकारी रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नाही, म्हणून अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेतात. मात्र खासगी रुग्णालयांनी रितसर परवानगी घेत नर्सिंग होम सुरू केले का, याबाबत अनेकांना माहीत नसते. उपचार मिळावा आणि लवकर बरे व्हावे या उद्देशाने रुग्ण व नातेवाईक खासगी रुग्णालयात धाव घेतात आणि अवाच्या सव्वा बिल आकारतात. त्यामुळे रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा' हे वाक्य आता फक्त ऐकण्यासाठी बरे वाटते. कारण काही खासगी रुग्णालयांनी आरोग्य सेवेच्या नावाखाली दुकान थाटल्याचे आरोग्य विभागाच्या कारवाईतून समोर आले आहे.

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बरे करूनच घरी पाठवणे हे रुग्णालय प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, रुग्णसेवेच्या नावाखाली लूट होत असल्याची ओरड नेहमीच होत असते. आता तर अनधिकृत नर्सिंग होम्सनी दुकाने थाटल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. मुंबईत १,५७० नर्सिंग होम आहेत. या नर्सिंग होम्सनी आरोग्य विभागाच्या सगळ्या परवानगी घेतली का याची माहिती घेण्यासाठी आरोग्य विभागाने सरप्राइज व्हिजीट केली. या सरप्राइज व्हिजीटमध्ये १७६ नर्सिंग होम्सनी आधीच आपले दुकान बंद केल्याचे निदर्शनास आले. तर १,५७० पैकी ४४ नर्सिंग होम विना परवानगी सुरु असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी दिली.

दरम्यान, आरोग्य विभागाकडे ४४ अनधिकृत नर्सिंग होम्सची नोंद असताना कारवाईचा बडगा का उगारला जात नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पहाणीत ४४ नर्सिंग होम बेकायदा सुरू असल्याचे निदर्शनास आले. यात ४२ नर्सिंग होम चालकांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पाहणी करत तपासणी अहवाल देण्यात येतो. तपासणी अहवालात नमूद केलेल्या त्रुटीची पूर्तता न केल्यास संबंधित नर्सिंग होम्सवर गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच, संबंधित नर्सिंग होम्सच्या मालकास न्यायालयाच्या माध्यमातून १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येतो, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

अशी झाली कारवाई

एकूण नर्सिंग होम - १,५७०

बंद झालेले नर्सिंग होम - १७६

बेकायदा नर्सिंग होम - ४४

नर्सिंग होम चालकांविरोधात गुन्हा दाखल - ४२

नर्सिंग होमवर न्यायालयीन कारवाई - १३

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in