
मुंबई : सुमारे अडीच कोटी रुपयांच्या चरससह हुसैन अब्दुल्ला शीररगांवकर या ४८ वर्षांच्या आरोपीस वरळी युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. हुसैन हा मुंब्रा येथील ठाकूरपाड्याचा रहिवाशी असून, त्याच्याकडून पोलिसांनी आठ किलो वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मशिदबंदर येथे काहीजण ड्रग्जची देवाणघेवाण करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने युसूफ मेहर अली रोड, गोदाम क्रमांक डीजवळील मुथ्थूमरियम मंदिराजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. दुपारी साडेबारा वाजता तिथे हुसैन शीरगांवकर हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकाऱ्यांना आठ किलो चरसचा साठा सापडला.