मार्वे बीचवर ५ मुले बुडाली ; दोघांना वाचवण्यात यश, तीन बेपत्तांचा शोध सुरु

कोस्ट गार्ड, नेव्ही, अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले
मार्वे बीचवर ५ मुले बुडाली ; दोघांना वाचवण्यात यश, तीन बेपत्तांचा शोध सुरु
Hp

मुंबई : रविवार सुट्टीचा दिवस समुद्र किनारी पाण्याचा आनंद लुटण्यासाठी चार ते पाच मुले मालाड पश्चिम येथील मार्वे बीचवर गेली होती. जवळपास अर्धा किलोमीटर आत गेलेल्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ती रविवारी सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच तेथे असलेल्या अन्य पर्यटकांनी दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र उर्वरित तिघांचा शोध लागला नसून कोस्ट गार्ड, नेव्ही, अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

रविवार सुट्टीचा दिवस, त्यात पावसाची रिपरिप सुरु असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनारी, चौपाट्यांवर मोठी गर्दी केली. मालाड पश्चिम येथील मार्वे बीचवर चार ते पाच मुले ही समुद्र किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटर आत समुद्रात गेली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मुले पाण्यात बुडाली. मुले बुडत असल्याची माहिती तेथे उपस्थित पर्यटकांना मिळताच पाचही मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी कुरशाना हरिजन (१६) व अंकुश शिवरे (१३) या दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात लोकांना यश आले. मात्र तिघे बेपत्ता झाले असून लाईफ गार्ड, अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

समुद्र किनारी, चौपाट्यांवर विशेष करुन पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. परंतु समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा धोकादायक ठरु शकतात, त्यामुळे समुद्रात जाऊ नये असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येते. तसेच लाईफ गार्ड व स्थानिक पोलीस याबाबत सतत अनाउन्समेंट करत असतात. तरीही काही अतिउत्साही सगळ्यांची नजर चुकवून समुद्रात खोल पाण्यात जातात आणि स्वतःचा जीव गमावून बसतात, अशा अनेक घटना घडल्या आहेत.

तिघा बेपत्तांचा शोध सुरु

शुभम जयस्वाल (१२), निखील कायामुकूर (१३) व अजय हरिजन (१२) या तिघा बेपत्ता मुलांचा शोध सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in