मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मतदान केंद्रांवर तसेच त्या भोवतीच्या ५० मीटर परिघात स्वच्छतागृहे तसेच अन्य प्रकारच्या स्वच्छता कामांसाठी मुंबई महानगरपालिकेने आपल्या प्रत्येक विभाग कार्यालयाला २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पालिकेची २५ विभाग कार्यालये सध्या कार्यरत असून या कामासाठी एकूण पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मतदान केंद्रांवर प्रसाधनगृहांची सोय नसल्यास प्रामुख्याने निवडणुकीच्या कामावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होते. हा अनुभव गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामात कर्मचाऱ्यांना आला आहे. त्यांची सोय व्हावी तसेच मतदारांचीही गैरसोय टाळली जावी, या हेतूने या विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर प्रसाधनगृहांच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी महानगरपालिकेच्या निधीतून प्रत्येक विभाग कार्यालयाला वीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी संबंधित विभाग अधिकाऱ्याने केवळ मतदान केंद्रातील प्रसाधनगृहांची स्वच्छता, अन्य प्रकारची स्वच्छता, पेयजल सुविधा, फिरती प्रसाधनगृहे, यासाठी आवश्यक ती यंत्र सामग्री या गोष्टींसाठीच खर्च करायचा आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या आधी दोन दिवस आणि त्यानंतर दोन दिवस हा निधी खर्च करता येईल. मतदान केंद्रांच्या सुविधांसाठी पालिकेच्या तिजोरीवर मात्र पाच कोटी रुपयांचा बोजा पडला आहे.