मुंबई : अंधेरी येथून ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीस कांदिवली युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. आफिजुर रेहमान अबूबकर असे आरोपीचे नाव असून, त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ५ किलो २५१ ग्रॅम वजनाचे चरस हस्तगत केले आहे. त्याची किंमत १ कोटी ५७ लाख ५३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आफिजुर नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा ठेवला असून, या ड्रग्जची तो लवकरच विक्री करणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी आफिजुरला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो अंधेरीतील मरोळनाका रोड, चिमटपाडा, सावित्रीबाई चाळीत राहत होता. त्याच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकून तेथून पाच किलो दोनशे एकावन्न ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत सुमारे दिड कोटी रुपये असल्याचे उघडकीस आले.