मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पाच वॉण्टेड आरोपींना डोंबिवली, कर्जत आणि अंबरनाथ येथून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अटक आरोपींमध्ये नितीन गौतम सप्रे, संभाजी किशन पारबी, राम फुलचंद कनोजिया, प्रदीप ठोंबरे आणि चेतन दिलीप पारधी यांचा समावेश असून अटकेनंतर या सर्वांना किल्ला न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या आरोपींवर हत्येतील शूटरला आर्थिक मदतीसह शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेने गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. गेल्या शनिवारी वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांची तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर पळून जाणाऱ्या गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन शूटरना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्या चौकशीतून प्रवीण रामेश्वर लोणकर याला पुण्यातून, तर हरिशकुमार बालकराम निशाद याला उत्तर प्रदेशातून पोलिसांनी अटक केली होती. चारही आरोपी २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर इतर आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेची तीन ते चार पथके डोंबिवली, कर्जत आणि अंबरनाथ येथे पाठविण्यात आली होती.