जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत ५ टक्के पाणीकपात

जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत ५ टक्के पाणीकपात
Published on

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलोव्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परिरक्षणाचे काम मंगळवार २४ ते शुक्रवार, २७ मे या कालावधीत दररोज सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ४ तासांकरिता हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत पिसे पांजरापूर संकुल येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शहर व उपनगरात ५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. कुलाबा, भायखळा, परळ, वडाळा, घाटकोपर, चेंबूर, भांडुप, मुलुंड या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे जलविभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, भायखळा, मस्जिद बंदर, परळ, वडाळा, कुर्ला या भागात ५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असून या परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या जीर्ण झाल्या आहेत. मुंबईत कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत असतात. मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्याचे अथवा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. वीज निर्मितीसाठी कोयना धरणातील पाणीसाठ्याचा जास्त वापर होत असल्याने पाणीसाठा कमी झाल्याने चिंता निर्माण झाली होती. मात्र पावसाळा जवळ येत असल्याने मुंबईसह राज्यातील नागरिकांची पाणाचिंता मिटली आहे.

logo
marathi.freepressjournal.in