
मुंबई : पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या गणेशोत्सवात गेली १० वर्षे शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील १० वर्षांत सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे व त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. असे असले तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. दरम्यान, ६ ऑगस्टपासून एक खिडकी योजनेनुसार सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाईन परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबई महानगराची सांस्कृतिक ओळख असणारा गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे.
एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करून नियमानुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असणार आहे.
परवानगी पाच वर्षांसाठी मिळणार असली तरी अशा मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. या नुतनीकरणात वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. याशिवाय खासगी जागेवर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी ठरलेल्या कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस यांची परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक असणार आहे.
मंडपासाठी १०० रुपये शुल्क
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सन २०२४ च्या उत्सवासाठी अवघे १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
१२३७ मूर्तिकारांकडून ऑनलाईन अर्ज
यंदाचा गणेशोत्सव २०२४ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार) देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना देण्यात आलेली परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहणार आहे. याशिवाय मूर्तिकारांसाठी एक खिडकी योजना देखील राबविण्यात आली आहे. आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.
५०० टन मोफत शाडू माती वाटप
पालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत मोफत शाडू मातीसाठी एकूण २१७ मूर्तिकारांनी मागणी केली आहे, त्यांना आतापर्यंत सुमारे ५०० टन मोफत शाडू माती देण्यात आली आहे.