नवीन वर्षात एसटी महामंडळाकडून शयनयान विनावातानुकूलित ५० नवीन बस प्रवाशांच्या सेवेत

एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या.
नवीन वर्षात एसटी महामंडळाकडून शयनयान विनावातानुकूलित ५० नवीन बस प्रवाशांच्या सेवेत
Published on

एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विनावातानुकूलित शयनयान आणि आसन व्यवस्था असलेल्या स्वमालकीच्या बस ताफ्यात दाखल केल्या आहेत. नवीन वर्षात एसटी महामंडळाकडून शयनयान प्रकारातील विनावातानुकूलित ५० नवीन बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून या बस केवळ कोकणात ‘रातराणी’ म्हणून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या. या बस सेवेत आल्यानंतर जादा भाडेदरामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. महामंडळाने त्यांच्या भाडेदरात कपात केल्यानंतरही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी, ती सेवा बंदच करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाचा वातानुकूलित शयनयान प्रयोग पूर्णपणे फसला. नोव्हेंबर २०१९मध्ये एकाच बसमध्ये शयनयान आणि आसन व्यवस्था असलेली विना-वातानुकूलित बस महामंडळाने घेतली. या स्वमालकीच्या बस सेवेला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या अशा २१८ बस ताफ्यात आहे. आता महामंडळाने केवळ शयनयान प्रकारातील ५० बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली आहे.

मार्च २०२३पर्यंत बसेस दाखल

मार्च २०२३ पर्यंत या बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यानंतरच या बस प्रवाशांच्या सेवेत येतील. लांब पल्ल्याच्या मार्गावर या बस रातराणी म्हणून चालवण्यात येणार असून त्यासाठी कोकणातील मार्गांचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. सध्या राज्यात एसटीच्या २५६ मार्गांवर ५०० हून अधिक बसगाड्या ‘रातराणी’ म्हणून धावत असून यात साध्या, निमआराम, तसेच शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसचा समावेश आहे. शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसमध्ये ३० पुश बॅक आसन व १५ शयनयान अशी प्रवासी क्षमता आहे.

logo
marathi.freepressjournal.in