मराठी माणसांच्या घरासाठी ५० टक्के आरक्षण; सरकार आल्यास तातडीने निर्णय, उद्धव ठाकरे यांची ग्वाही

विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार आल्यास मुंबईत मराठी माणसांच्या घरांसाठी ५० टक्के आरक्षणाचा निर्णय तातडीने घेणार, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
मराठी माणसांच्या घरासाठी ५० टक्के आरक्षण; सरकार आल्यास तातडीने निर्णय, उद्धव ठाकरे यांची ग्वाही
उद्धव ठाकरे

गिरीश चित्रे / मुंबई

मुंबई मराठी माणसाची असून मराठी माणसाने मुंबईसाठी लढा दिला आहे. मुंबईसाठी मराठी माणसाने रक्त सांडले. त्यामुळे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे. विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार आल्यास मुंबईत मराठी माणसांच्या घरांसाठी ५० टक्के आरक्षणाचा निर्णय तातडीने घेणार, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मंत्रालयासमोरील शिवालय येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईसाठी मराठी माणसाने लढा दिला, रक्त सांडून मराठी माणसाने मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मराठी माणसाचा मुंबईवर पहिला अधिकार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मराठी माणसांच्या घरासाठी ५० टक्के आरक्षण ठेवणार आणि तसा निर्णय तातडीने घेणार, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आमची सत्ता असताना मराठी भाषा सक्तीची केली. दुकानांवर मराठी फलक सक्तीचे केले. गिरणी कामगारांना घर मिळावे म्हणून आजही आम्ही आग्रही आहोत. आमचे सरकार गद्दारी करून पाडले नसते तर आम्ही मराठी माणसांच्या घरासाठी आरक्षण केलेच असते, असे त्यांनी सांगितले.

भाजपकडे लोढासारखे विकासक आहेत. पालक मंत्रीही बिल्डर आहेत, मुंबई महापालिका मुख्यालयात ते बसतात. त्यामुळे ‘लोढा टॉवर’मध्ये मराठी माणसांच्या घरासाठी ५० टक्के आरक्षण ठेवावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. गुरुवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज (शुक्रवारी) केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, या सरकारला जराजरी संवेदना असेल, तर दोन वर्षांत जेवढ्या घोषणा केल्या त्यापैकी किती घोषणांची पूर्तता झाली तेवढं त्यांनी खरेपणाने सांगितले तर खूप केले असे म्हणता येईल, असे ते म्हणाले.

महायुतीच्या अपयशाचा चेहरा समोर येऊ दे!

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदारराजाने पसंती दिली. महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश हाती आलेले नाही. त्यामुळे महायुतीच्या अपयशाचा चेहरा समोर येऊ दे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर येईल, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.

परिषदेत तीन जागा येणार

शिवसेनेचा एक, काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी होणार, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर तेही निवडून येणार, असेही ते म्हणाले. महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.

केंद्र काय निर्णय घेते ते बघू!

समाजवादी पक्षाने ५ टक्के आरक्षणाची मागणी केली असली तरी केंद्रात नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेते ते बघू आणि पुढील निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

केंद्र, राज्यात ‘लिकेज’ सरकार

खोके सरकार, महायुतीचे डबल इंजिन सरकार सगळेच म्हणतात, परंतु केंद्र आणि राज्यातील सरकार हे ‘लिकेज’ सरकार आहे. अयोध्येतील राम मंदिरात गळती लागली आहे, पेपर लिक होत आहेत, याबाबत काही प्रश्न उपस्थित केले तर उलट आमच्यावरच आरोप करतात. परंतु, गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आम्ही मांडणार आणि लिकेज सरकारला जाब विचारणार, असा सज्जड दम उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला भरला.

logo
marathi.freepressjournal.in