नवी दिल्ली/मुंबई
मुंबई विमानतळावरील मंगळवारी विस्तारा एअरलाइन्सची ५० उड्डाणे रद्द करण्यात आली असून १६० उड्डाणांना विलंब झाला आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला व मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. अंतर्गत समन्वयाचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे म्हटले जात असतानाच, पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा दावा विस्ताराने केला आहे. या पार्श्वभूमीवर विमानांच्या उड्डाणांना होणारा विलंब आणि उड्डाणे रद्द करण्याबाबत दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश मंगळवारी नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) विस्तारा एअरलाइन्सला दिले आहेत. वैमानिकांच्या अनुपलब्धतेमुळे उड्डाणांना विलंब होत असून काही उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. त्यावर नागरी उड्डाण मंत्रालय लक्ष ठेवून आहे. मंगळवारी विस्तारा एअरलाइन्सने जवळपास ५० हून अधिक उड्डाणे रद्दे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याने उड्डाणे रद्द करण्यात येत असल्याचे एअरलाइन्सने जाहीर केले. त्यानंतर ए-३२० ताफ्यातील काही उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे कारण देत वेतनश्रेणी पुनर्रचनेबद्दल निषेध केला, असे सूत्रांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर डीजीसीएने एअरलाइन्सला उड्डाणे रद्द का करण्यात आली अथवा विलंबाने उड्डाणे का होत आहेत याविषयी दैनंदिन माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. विस्ताराच्या उड्डाणांना विलंब होत असल्याबद्दल अथवा रद्द करण्यात आल्याबद्दल प्रवाशांनी समाज माध्यमांवर संताप व्यक्त केला. डीडीसीए स्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे सांगण्यात येत आहे.