खिचडी बेचव तर ५ हजारांचा दंड: सुपरवायझर, बिट ऑफिसरची शाळांत सरप्राइज व्हिजिट; चेंबूर येथील घटनेनंतर पालिकेचे सावध पाऊल

विद्यार्थ्यांना दर्जेदार खिचडी देण्यात येणार आहे. परंतु खिचडी बेचव असल्यास संबधित संस्थेला थेट पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार
खिचडी बेचव तर ५ हजारांचा दंड: सुपरवायझर, बिट ऑफिसरची शाळांत सरप्राइज व्हिजिट;
चेंबूर येथील घटनेनंतर पालिकेचे सावध पाऊल

मुंबई : चेंबूर येथील आणिक गावातील पालिका शाळेत १६ विद्यार्थ्यांना खिचडी खाल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना १३ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली होती. तसा प्रकार भविष्यात घडू नये, यासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार खिचडी देण्यात येणार आहे. परंतु खिचडी बेचव असल्यास संबधित संस्थेला थेट पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच खिचडी खाल्यानंतर अपचन असा प्रकार घडल्यास संबंधित संस्थेवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, खिचडीचा दर्जा तपासणीसाठी सुपरवायझर बिट ऑफिसरची शाळांत सरप्राइज व्हिजिट करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी वाटप करण्यात येते. मात्र गोवंडी येथील पालिका शाळांतील २१९ विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना १० ऑगस्ट २०१८ मध्ये घडली होती. या घटनेत १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. तर चेंबूर येथील आणिक गावातील पालिका शाळेत १६ विद्यार्थ्यांना खिचडी खाल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना घडली होती. खिचडी खाल्ल्यानंतर विषबाधा होण्याचे प्रकार टाळण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने कठोर कारवाई करण्यासह विद्यार्थ्यांना दर्जेदार खिचडी मिळावी यासाठी नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन वर्षांसाठी नव्याने निविदा!

सन २०२४-२५, २०२५-२०२६ आणि सन २०२६-२७ या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना चविष्ट व पौष्टिक खिचडी वाटप करण्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहे. पुढील ८ ते १० दिवसांत निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिका शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात येते. गेल्या वर्षी १५२ संस्थांच्या माध्यमातून खिचडी वाटप करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र १५२ संस्थांचा करार संपुष्टात येत असल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

खिचडीवर नजर

विद्यार्थ्यांना दर्जेदार खिचडी मिळावी यासाठी सुपरवायझर, बिट ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली असून ते सरप्राइज व्हिजिट करतील.

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खिचडी मिळणार

दोन हजार, चार हजार, सात हजार व १० हजार असे विद्यार्थ्यांचे गट तयार केले असून त्याप्रमाणे खिचडीचे वाटप होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in