लाडक्या बाप्पाच्या आगमनाला दीड महिना शिल्लक असला तरी गणेश भक्तांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मुंबईत १२ हजार गणेशोत्सव मंडळ असून त्यापैकी ५३० मंडळांनी पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी १८५ मंडळांना परवानगी दिली आहे, तर कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने ३५ मंडळाचे अर्ज नाकारण्यात आल्याचे गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितले.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर निर्बंध होते; मात्र कोरोना आटोक्यात आल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळांची तयारी सुरू झाली आहे. मंडप उभारण्यासाठी पालिकेकडे गणेशोत्सव मंडळांकडून परवानग्यांसाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे आतापर्यंत ५३० अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १८५ अर्जांना महानगरपालिकेने परवानगी दिली आहे, तर २५४ अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहेत. ५६ दुबार अर्ज आले आहेत. तर अपुऱ्या कागदपत्रांमुळे ३५ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडपासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार मंडळांकडून अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांकडून एकूण ५३० अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्जांच्या परवानग्यांमध्ये वाहतूक, स्थानिक पोलीस तसेच मुंबई महापालिकेच्या कार्यालयीन परवानगीचा समावेश असतो. आतापर्यंत कुर्ला, दादर, प्रभादेवी, वरळी, गिरगाव आदी भागातून मुंबई महानगरपालिकडे परवानगीसाठी गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केले आहेत.