मुंबई : भंगार विक्रीतून कमाई, माल वाहतुकीतून उत्पन्न मिळवणाऱ्या मध्य रेल्वेच्या तिजोरीत जाहिरातीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होतो. रेल्वे स्थानकांत, टीव्ही स्क्रीनवर, डब्यात विविध कंपनीच्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात येतात. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात मध्य रेल्वेच्या विविध विभागांत जाहिरात प्रसिद्ध केल्याने मध्य रेल्वेची तब्बल ५४.५१ कोटींची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या विविध विभागांपैकी जाहिरातीतून महसूल मिळवून देण्यात मुंबई नंबर वन असल्याचे समोर आले आहे.
प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने उत्पन्नाचे साधन म्हणून रेल्वे हद्दीत कंपनी, व्यवसायिक अशा जाहिराती प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली आहे. मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर दररोज ५० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे हद्दीत जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी बड्या कंपन्या मध्य रेल्वे प्रशासनाला पैसे मोजतात. ट्रेनच्या डब्यांवर विनाइल रॅपिंग, स्थानकांवर होर्डिंग आणि टीव्ही स्क्रीनवरील जाहिरातींच्या माध्यमातून मध्य रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. प्रवासी सेवा आणि रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, नॉन-फेअर महसूल वाढवण्यासाठी नवीन संधी व नाविन्यपूर्ण जाहिरात धोरणे शोधण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे.
विभाग - महसूल ( कोटीत)
मुंबई - ४६.४४
भुसावळ - ०.९२
नागपूर - १.०५
सोलापूर - ०.८६
पुणे - ५.२५
एकूण ५४.५१