
मुंबई : गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव सदैव मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांची धावपळ आता कमी होणार आहे. ज्याठिकाणी पोलीस स्टेशन आता त्या पोलीस स्टेशनच्या आवारात घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारच्या गृह विभागाने घेतला आहे. ५५ हजार घरे बांधण्यात येणार असून ४५० ते ६०० चौरस फुटांची सोयीसुविधांसह घरे बांधण्यात येणार आहे.
पोलिसांची होणारी धावपळ, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने पोलीस स्टेशनच्या आवारात घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या १४ कोटींच्या घरात पोहोचली असून जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचे मजबुतीकरण करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र पोलीस दलात १ लाख ९५ हजार पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यापैकी मुंबई पोलीस दलात ५१ हजार ३०८ पोलीस दलात कार्यरत आहेत.
मायानगरी मुंबईत स्वतःचे घर घेणे आवाक्याबाहेर असून घराचे भाडे ही खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे अनेक मुंबई पोलीस मुंबई बाहेर ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ बदलापूर याठिकाणी वास्तव्यास आहेत. मुंबईपासून ६० ते ८० किलोमीटर लांब राहत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना वेळेवर ड्युटीवर हजर राहणे शक्य होत नाही. धावपळीच्या जीवनात पोलिसांना आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे पोलिसांना पोलीस स्टेशनच्या आवारात घर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. मुंबईत पोलिसांच्या २० वसाहती असून ती अपुरी पडतात. त्यामुळे गृह विभागाने मुंबईत ५५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईतील ७५ प्लाॅट बघण्यात आले असून हे प्लाॅट शासकीय असल्याचे निकम यांनी सांगितले. पुढील तीन ते चार वर्षांत ही घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई पोलीस दलाची संरचना ही ब्रिटिश कालखंडापासून अस्तित्वात असून मुंबई पोलीसांना अभिमानास्पद इतिहास व दीर्घकालीन परंपरा लाभलेली आहे. मुंबई पोलिसांचा इतिहास हा मुंबई शहराच्या प्रगतीशी घट्ट जोडलेला असून, १८५६ मध्ये स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय देशातील सर्वोत्कृष्ट व आदर्श पोलीस दलांपैकी एक आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध शहर असून येथे लाखो परदेशी पर्यटक, व्यापारी सतत मुंबईमध्ये येत असतात. त्यामुळे मुंबई पोलिसांना सुरक्षेच्या जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात पार पाडाव्या लागतात. त्यामुळे पोलिसांची दगदग कमी व्हावी त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासह कुटुंबीयांसमवेत वेळ घालवता यावा, यासाठी मुंबईत ५५ हजार घरे बांधण्यात येणार आहेत.
कोणाला किती जागा…
४५० चौरस फूट - पोलीस कर्मचारी
५५० ते ६०० चौरस फूट - वरिष्ठ पोलीस अधिकारी
प्रकल्पाचा अभ्यास, शिफारसीसाठी समिती स्थापन
पोलीस स्टेशनच्या आवारात घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात उपनिरीक्षक व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी ही घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
प्रकल्पाचा अभ्यास करण्यासह शिफारस सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव, गृह यांच्या अध्यक्षतेखालील १५ जणांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.