गुंतवणूकदारांचे ५.५४ लाख कोटींचे नुकसान; सेन्सेक्स,निफ्टीचा एक वर्षाचा निचांक

बीएसईतील सर्व नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य कमी होऊन २,३९,२०,६३१.६५ कोटी इतके झाले आहे
गुंतवणूकदारांचे ५.५४ लाख कोटींचे नुकसान; सेन्सेक्स,निफ्टीचा एक वर्षाचा निचांक

प्रारंभीच्या तेजीनंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्हने ०.७५ टक्का व्याजदरवाढ केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात घसरणीचा कल कायम राहिला. एवढेच नव्हे तर सेन्सेक्स आणि निफ्टी एक वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत. गुंतवणूकदारांचे गुरुवारच्या सत्रात ५.५४ लाख कोटींचे नुकसान झाले आहेत. बीएसईतील सर्व नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य कमी होऊन २,३९,२०,६३१.६५ कोटी इतके झाले आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरावाढीचे परिणाम जगभरातील बाजारावर झाले. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सची १,०४६ अंकांची घसरगुंडी झाली. दरम्यान, भारतीय शेअर बाजारात पाच सत्रांपासून घसरण सुरु असताना भारतीय चलन बाजारात रुपयाची असलेली घसरण गुरुवारी थांबली. डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी मजबूत होऊन ७८.१० झाला.

सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाली असून रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचा घसरणीत मोठा वाटा आहे. सकाळच्या सत्रातील तेजी दुपारनंतर घसरणीत रुपांतर होऊन सेन्सेक्स १,०४५.६० अंक किंवा १.९९ टक्के कोसळून ५१,४९५.७९ वर बंद झाला. सेन्सेक्सची सलग पाचव्या सत्रात घसरण कायम आहे. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ३३१.५५अंक किंवा २.११ टक्के घटून १५,३६०.६० वर बंद झाला.

बीएसईतील सर्व क्षेत्रात घसरण झाली. धातू - ५.४८ टक्के, बेसिक मटेरियल्स - ३.५५ टक्के, औद्योगिक - ३.०६ टक्के, दूरसंचार -३.०४ टक्के, बांधकाम उद्योग - २.६९ टक्के, तंत्रज्ञान कंपन्या - २.५१ टक्के, आयटी - २.४८ टक्के आणि युटिलिटीज -२.३९ टक्के घसरले. तसेच जवळपास २,७५४ कंपन्यांच्या समभागात घसरण तर ६२० कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. तसेच शंभर कंपन्यांच्या समभागात बदल झाला नाही. स्वीस नॅशनल बँकेने गेल्या १५ वर्षांत प्रथमच व्याजदरात वाढ केली आहे.

सेन्सेक्सवर्गवारीत टाटा स्टील, टेक महिंद्रा, इंडस‌्इंड बँक, विप्रो,भारती एअरटेल, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक आणि एनटीपीसी यांच्या समभागात घसरण झाली. नेस्ले इंडिया या एकमेव कंपनीच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात शांघायमध्ये घसरण तर टोकियो, सेऊलमध्ये किंचित वाढ झाली. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घसरण सुरु होती. विशेष म्हणजे फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर अमेरिकेतील बाजारात बुधवारी रात्री वाढ झाली होती.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.६६ टक्का घटून प्रति बॅरलचा भाव ११७.६८ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी बुधवारच्या सत्रात ३,५३१.१५ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in