मुंबई : सुमारे ६२ लाखांच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्य दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे. राजू ऊर्फ राजेंद्र बन्सीलाल रावल आणि मधुसुदन शीतल मंडल अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. संदीप सोहनलालजी जैन ज्वेलर्स व्यापारी असून, त्यांचा सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे झव्हेरी बाजार येथे एक दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मधुसुदनला ३७ लाख २० हजारांचे ६४८ ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिले होते; मात्र त्याने सोन्याचे दागिने न बनविता सोन्याचा अपहार करून पलायन केले होते. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच त्यांनी मधुसुदन मंडलविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. दुसऱ्या घटनेत राजू रावलने कांदिवलीतील एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. अनिल बसंतीलाल पामेचा हे कांदिवली येथे राहत असून, त्यांचा होलसेलमध्ये दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची राजूसोबत ओळख झाली होती. त्यांनी २५ लाखांचे ४२५ ग्रॅम वजनाचे दागिने विक्रीसाठी दिले होते; मात्र त्याने या दागिन्यांचा अपहार करून अनिल पामेचा यांची फसवणूक केली होती.