मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे आणि सीएसएमटी स्थानकातील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी घेतलेल्या ब्लॉकचा रविवारी अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशीही प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत असल्याने तसेच त्या भायखळा आणि वडाळा स्थानकापर्यंत चालविण्यात येत असल्याने भायखळा, वडाळा, दादर, कुर्ला, परेल, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या वर्दळीच्या रेल्वे स्थानकांवर अलोट गर्दी उसळली होती. लोकलमध्ये प्रवेश करण्यास जागा नसल्याने प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या गर्दीतून मार्ग काढत बसचा आसरा घेतला. अखेर ब्लॉकनंतर सीएसएमटी स्थानकातून पहिली लोकल दुपारी १:१० वाजता टिटवाळ्याला रवाना झाली.
सीएसएमटी स्थानकातील कामांसाठी घेतलेला ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत होता. त्यामुळे सकाळी मुख्य मार्गावरील लोकल भायखळा आणि हार्बर मार्गावरील लोकल वडाळ्यापर्यंत चालविण्यात येत होत्या. त्यामुळे इच्छित ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना वडाळा, भायखळा स्थानकापासून बेस्ट बसचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, गर्दीच्या तुलनेत बेस्ट बस कमी असल्याने बसेसना प्रचंड गर्दी होती.
तर घाटकोपर स्थानकातील फलाट क्रमांक २, कुर्ला येथील फलाट क्रमांक ४, सायन येथील फलाट क्रमांक २ वर धीम्या मार्गावरील लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. लोकल विलंबाने धावत असल्याने अप व डाऊन मार्गांवर प्रवाशांना बराचवेळ फलाटांवर ताटकळत उभे राहावे लागले. भायखळा, दादर आणि वडाळा रेल्वे स्थानकांबाहेर बस आणि टॅक्सी पकडण्यासाठी तर कुर्ला, घाटकोपर या पूर्व उपनगरातील स्थानकांबाहेर रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ब्लॉकमुळे सुरू असलेले मुंबईकरांचे हाल रविवारीही कायम राहिले. मात्र, दुपारनंतर लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
भारतीय रेल्वेतील पहिले पोर्टल सीएसएमटी स्थानकात
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकातील कामांसाठी घेण्यात आलेला ३६ तासांचा ब्लॉक रविवारी संपुष्टात आला. ब्लॉक कालावधीत टर्नआऊट्सचे एकत्रीकरण, मांडणी आणि विघटन, ओव्हर हेड इक्विपमेंट (ओएचई) पोर्टल्सची उभारणी यासह सर्व १० लाईन कव्हर करणारे ५३ मीटरचे २ विशेष पोर्टल उभारणे समाविष्ट होते, जे भारतीय रेल्वेवर पहिल्यांदाच घडले असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. या ब्लॉकच्या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारासह प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे, पॉइंट्स, सिग्नल्स, डीसी ट्रॅक सर्किट आणि इतर तांत्रिक कामे करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय) चालू करण्याचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे.
यासाठी घेतला होता ब्लॉक
सीएसएमटी स्थानक
> सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ ची ३८५ मीटरने वाढ केल्यानंतर, लांबी ६९० मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे येथून २४ डब्यांच्या गाड्या धावू शकणार आहेत.
> प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याबरोबरच पॉइंट्स, सिग्नल्स, डीसी ट्रॅक सर्किट आणि इतर तांत्रिक कामे करण्यात आली.
> २५० कर्मचारी आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या टीमच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले.
ठाणे स्थानक
> ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म ५ व ६ हे ३०० हून अधिक उपनगरी तसेच मेल/एक्स्प्रेस गाड्या हाताळणाऱ्या सर्वात व्यस्त प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.
> येथील कामांसाठी २ काँक्रीट पंप, ५ पोकलेन, १ रोलर, १ बॅलास्ट ट्रेन, ३२ टँक वॅगन आणि ४ लोकोमोटिव्हचा वापर करण्यात आला.
> १५ वरिष्ठ विभाग अभियंते आणि १० विविध कंत्राटदारांच्या सुमारे ४०० मजुरांनी येथे काम केले.
मध्य रेल्वेकडून सर्वांचे आभार
पश्चिम रेल्वेने २ जून रोजी देखभाल ब्लॉक रद्द केल्याबद्दल आणि ब्लॉक प्रभावित भागात अतिरिक्त बस चालवल्याबद्दल बेस्ट आणि महानगरपालिका प्राधिकरणांचे मध्य रेल्वे प्रशासनाने आभार मानले. कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिल्याबद्दल सर्व संस्थांचे तसेच मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह मुंबईकरांचेही आभार मध्य रेल्वे प्रशासनाने मानले आहेत.