सहा दिवसांत फटाक्यांमुळे ६४ आगीच्या घटना

२२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान १५५ आगीच्या घटना घडल्या त्यापैकी ६४ आगीच्या घटना फटाक्यांमुळे लागल्या आहेत
सहा दिवसांत फटाक्यांमुळे ६४ आगीच्या घटना

मुंबईत आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान १५५ आगीच्या घटना घडल्या त्यापैकी ६४ आगीच्या घटना फटाक्यांमुळे लागल्या आहेत.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर गेली दोन वर्षे सण साजरे करण्यावर निर्बंध होते; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्यानंतर प्रत्येक सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या दिवाळीत मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दिवाळीच्या सहा दिवस फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाके फोडताना काळजी घ्या, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. तरीही फटाके फोडताना योग्य ती काळजी न घेतल्याने आगीच्या घटना घडल्याचे दिसून येते.

शनिवारी २२ ऑक्टोबरला १७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी २ आगी फटाक्यामुळे लागल्या. रविवारी २३ ऑक्टोबरला २७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी ७ आगी फटाक्यामुळे लागल्या. सोमवारी २४ ऑक्टोबरला ४१ आगीच्या घटनांची नोंद झाली, त्यापैकी २८ आगी फटाक्यामुळे लागल्या. २५ ऑक्टोबरला आगीच्या ३६ घटना घडल्या त्यापैकी १२ आगीच्या घटना फटाक्यांमुळे लागल्या आहेत, तर २६ व २७ ऑक्टोबर रोजी आगीच्या ३४ घटना घडल्या त्यापैकी १५ आगीच्या घटना फटाक्यांमुळे लागल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in